July 27, 2024

चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने एमआयडीसीमध्ये भारनियमनाची शक्यता

पुणे, दि. ०२ जून २०२३: चाकण येथील महापारेषणच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने सुमारे १० ते १५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यासाठी महावितरणकडून भारव्यवस्थापनाचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र विजेची मागणी अधिक असल्याने गरज भासल्यास चाकण एमआयडीसीमधील काही वीजवाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण येथील ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातून चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी (दि. १) मध्यरात्रीनंतर बिघाड झाला. त्याची तपासणी केला असता तो पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. त्यानंतर महापारेषणकडून नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या कामासाठी मंगळवार (दि. ६)पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान महापारेषणच्या या उपकेंद्रातील उर्वरित दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरवर नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा वीजभार टाकण्यात आला आहे. सध्या विजेची मागणी वाढली आहे व उर्वरित १० ते १५ मेगावॅट विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र गरज भासल्यास नानेकरवाडी, कुरुळी, एमआयडीसी, सारा सिटी, फोर्स मोटर्स, चिंबळी, आळंदी फाटा व खालुंब्रे या २२ केव्ही वीजवाहिन्यांवर दिवसा चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे. या सर्व वीजवाहिन्यांवर उच्चदाबाचे ७४ आणि लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकचे ३८५० असे एकूण ३९२४ ग्राहक आहेत. विजेच्या भारनियमनाची गरज भासल्यास संबंधित वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

चाकणमध्ये होर्डिंग्जमुळे ४६ हजार ग्राहकांची वीज खंडित – चाकण शहर व परिसरात गुरुवारी (दि. १) सायंकाळी वादळासह मुसळधार पूर्वमोसमी पाऊस झाला. या वादळात विविध ठिकाणी लावलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचे फ्लेक्स महावितरणच्या अनेक वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा केवळ होर्डिंग्जच्या फ्लेक्समुळे तर उर्वरित १० टक्के वीजपुरवठा मोठी झाडे व फांद्या यंत्रणेवर पडल्यामुळे खंडित झाल्याचे निदर्शनास आले. सायंकाळनंतर महावितरणकडून वीज यंत्रणेवरील फ्लेक्स काढणे व वीजतारांची दुरुस्ती करण्याचे काम अविश्रांत सुरू होते. शुक्रवारी (दि. २) पहाटे तीन वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र वादळामुळे उडालेले फ्लेक्स वीजवाहिन्यांच्या तारांवर पडल्याने चाकणमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला.