October 14, 2024

पुणे स्टेशन भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई

पुणे, १८/०३/२०२३: पुणे स्टेशन भागातील ताडीवाला रस्ता परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

प्रतीक सुनील काकडे (वय २२), रोहन उर्फ पांड्या सुनील काकडे (वय २४), रामनाथ उर्फ पापा मेनीनाथ सोनवणे (वय २१), शुभम जीवन वानखेडे (वय २१, सर्व रा. ताडीवाला रस्ता) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख सागर उर्फ सॅगी किशोर गायकवाड (वय २१) आणि एक साथीदार पसार झाले असून त्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. ताडीवाला रस्ता परिसरात सागर गायकवाड आणि साथीदारांनी दहशत माजविली होती. गेल्या महिन्यात पाळीव श्वानाला घेऊन निघालेल्या एकाला गायकवाड आणि साथीदारांनी मारहाण केली. त्याच्यावर गजाने हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केला होता.

या टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी जगताप, उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांनी तयार केला होता. प्रस्ताव पडताळणीसाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी मोक्का लावला