May 20, 2024

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील आस्थापना सुरु ठेवण्यास मनाई

पुणे, 09 मे 2024 : पुणे व शिरुर मतदार संघात १३ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये यासाठी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यावसायिक दुकाने, रेस्टॉरंट, टपऱ्या आदी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शहराचे पोलीस सहआयुक्त प्रविण पवार यांनी जारी केले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर व हडपसर विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. हे आदेश पुणे लोकसभा मतदार संघांतील ४०५ मतदान केंद्रामधील २०१७ मतदान खोल्यांसाठी तसेच शिरुर मतदार संघातील १२९ मतदान केंद्रांमधील ७०८ मतदान खोल्यांसाठी लागू राहतील. मतदान केंद्रांच्या १०० मीटर सभोवतालच्या परिसराचा प्रचारासाठी व इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये जारी करण्यात आले आहेत. हे आदेश १२ मे रोजी रात्री १२ वाजेपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहतील.