May 18, 2024

पुणे: कोथरूडमध्ये शॉपी फोडून २०० मोबाइल लंपास, तब्बल ५३ लाखांच्या ऐवजावर डल्ला

पुणे, दि. २४/०९/२०२३: कोथरूड परिसरात असलेल्या डहाणूकर कॉलनीतील शॉपी फोडून चोरट्यांनी रोकडसह तब्बल २०० मोबाइल चोरुन नेले आहेत. ही घटना २३ सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास कलाकृती हौसिंग सोसायटीतील स्मार्ट कॅफे मोबाइल शॉपीत घडली आहे. याप्रकरणी गौरव शिंदे (वय ३१ रा. वारजे )यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव यांची डहाणूकर कॉलनीतील कलाकृती हौसिंग सोसायटीमध्ये मोबाइल शॉपी आहे. २३ सप्टेंबरला मध्यरात्रीच्य सुमारास तीन चोरट्यांनी शॉपीचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील १ लाख ६४ हजारांची रोकड आणि वेगवेगळ्या कंपनीचे नवीन २०० मोबाइल असा ५३ लाख १३ हजारांचा ऐवज चोरुन नेला. दुसर्‍या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या गौरवला मोबाइल शॉपीत चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी तातडीने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करीत आहेत.