December 2, 2023

पुणे: वंचित विकासतर्फे ‘स्वदेशी वापरा’चा नारा

पुणे, २५/०९/२०२३: गेल्या ३८ वर्षांपासून सामाजिक कार्यात भरीव योगदान देत असलेल्या वंचित विकास संस्थेतर्फे गणेशोत्सवात ‘स्वदेशी वापरा’चा संदेश दिला आहे. वीसहून अधिक गणेश मंडळांसोबत हा उपक्रम राबविण्यात येत असून, स्थानिक व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहून स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन संस्थेचे कार्यकर्ते करीत आहेत. याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने दिवाळीमध्ये स्वदेशी वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, त्यात सहभागी होण्यासाठी संस्थेच्या पत्त्यावर संपर्क साधावा, असे कळवले आहे.

विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी वंचित विकास कार्यरत आहे. समाज प्रबोधन हा संस्थेच्या कार्याचा पाया आहे. संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांनी समाज प्रबोधनावर लिहिलेली अनेक मार्गदर्शक पुस्तके संस्थेद्वारा प्रकाशित झालेली आहेत. याच समाज प्रबोधनाचा एक भाग म्हणजे संस्था दरवर्षी गणपती मंडळांच्या माध्यमातून एका विशिष्ट विषयावर प्रकाश टाकून समाज प्रबोधन व जनजागृती करीत असते.

‘देशाच्या विकास व स्मृद्धीकरीता स्वदेशीचा वापर गरजेचा आहे. यासाठी महिला बचतगट उत्पादने, लघुउद्योजक, गृह उद्योग, ग्रामीण व शहरी गृहउद्योग यांना पाठबळ द्या, त्यासाठी स्वदेशी वापरा!’ ही जनजागृती मोहीम यंदाच्या गणेश उत्चवात संस्थेद्वारा राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सुंदर गणपती मंडळ, कस्तुरे चौक तरुण मंडळ, जय जवान मंडळ, हिंद माता तरुण मंडळ, समाज विकास मंडळ, गोखले स्मारक चौक, महाराष्ट्र तरुण मंडळ, श्रीराम अभिमन्यू मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, लोकमान्य टिळक मंडळ, ऋतुराज मित्र मंडळ, विनायक मित्र मंडळ, अशोक मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, जय हिंद मित्र मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, महाराष्ट्र नवयुग तरुण मंडळ, वीर हनुमान तरूण मंडळ, विश्वकर्मा मित्र मंडळ आदी गणेश मंडळांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.