पुणे, दि. २५ सप्टेंबर २०२३: पुणेकरांच्या सर्वाधिक उत्साहाच्या व आनंदाच्या गणेशोत्सवामध्ये मंडळांनी उभारलेले देखावे, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. या उत्सवात सुरळीत वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी महावितरणची पुणे परिमंडल अंतर्गत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमध्ये सुमारे ४ हजार ५७५ अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांचे कर्मचारी आवश्यक साहित्य व साधनसामुग्रीसह वीज ग्राहकांना सेवा देत आहेत. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीमध्ये वीजसुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
गणेशोत्सवामध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार वीजपुरवठ्याचा सातत्याने आढावा घेत आहे. तसेच वीजसुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची ठिकाणे आणि मोठ्या मिरवणुका निघणारे मार्ग या ठिकाणी गणेशोत्सवापूर्वी वीजयंत्रणेची पाहणी करून देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी किंवा मिरवणुकीच्या मार्गावर नागरिक किंवा लहान मुले फिडर पिलरवर चढू नयेत यासाठी फिडर पिलरवर खिळे लावण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी तसेच तातडीच्या मदतीची गरज भासल्यास पुणे व पिंपरी चिंचवड शहर, आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक दि. २९ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही तक्रारींसाठी १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध राहणार आहे.
विसर्जन मिरवणुकींच्या कालावधीत मोबाईल व्हॅन व आवश्यक साधनसामुग्रीसह अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे. शहरातील महत्त्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी मोदी गणपती परिसरात तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी अभियंते व कर्मचार्यांची विशेष नियुक्ती करण्यात येत आहे. मिरवणूक संपेपर्यंत हा कक्ष कार्यान्वित राहील. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतील मार्गावर उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणेपासून आबालवृद्धांसह भाविक मंडळी सुरक्षित अंतरावर राहतील यासाठी महावितरणचे कर्मचारी त्या-त्या ठिकाणी देखरेख करणार आहे. प्रामुख्याने लहान मुले तसेच नागरिकांनी देखावे किंवा मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा किंवा फिडर पिलरवर चढू नये किंवा त्याचा आधार घेऊ नये तसेच असा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्तीस परावृत्त करावे. तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उभे राहून उंच झेंडे उंचावताना उपरी वीज वाहिन्यांपासून सावध राहावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता पुणे परिमंडल- ‘सुरळीत वीज पुरवठ्यासोबतच लाखो भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेली महावितरणची वीजयंत्रणा निर्धोक ठेवण्यासाठी यापूर्वीच देखभाल व दुरुस्तीच्या उपाययोजना केलेल्या आहेत. प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांनी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज सुरक्षेबाबत सतर्क व सजग राहावे. तसेच सर्व नागरिकांनी देखील वीजयंत्रणेपासून योग्य सुरक्षित अंतर राखावे’.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान