October 3, 2024

पुणे: पैलवान विजय डोईफोडेच्या उपचारांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ लाखांची मदत

पुणे, ११/०८/२०२४: अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत असलेला पैलवान विजय डोईफोडे यांच्या उपचारांसाठी पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. तब्बल ५ लाख रुपयांची आर्थिक मदत पुनीत बालन ग्रुपकडून जाहीर करण्यात आली असून चांगल्या रुग्णालयात डोईफोडे यांना दाखल करुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

राज्य पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धा गाजवणारा आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २२ वर्षीय विजय डोईफोडे याचा गत आठवड्यात स्वारगेट भागात दुचाकी खड्ड्यात आपटून गंभीर अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डोईफोडे यांच्या कुटुंबियांकडून आणि मित्र परिवाराने उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. ही बाब समजताच युवा उद्योजक व ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी तातडीने ५ लाख रुपये आर्थिक मदत देऊन या युवा पैलवानाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला. एवढेच नाही तर गरज पडल्यास अन्य हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. ‘पुनीत बालन ग्रुप’ हा खेळाडूंसाठी हक्काचा बनला आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक खेळाडूंना दत्तक घेऊन केवळ पैशांअभावी त्यांची गुणवत्ता वाया जाऊ नये आणि त्यांना योग्य संधी मिळावी, या काळजी घेतली आहे. त्यांच्या या योगदानाचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

‘‘पैलवान विजय डोईफोडे याने अनेक पदकं आपल्या महाराष्ट्रासाठी जिंकली आहेत. त्याच्या उपचारांसाठी पुनीत बालन ग्रुपकडून ५ लाखांची मदत दिली, परंतु गरज पडल्यास त्याला दुसऱ्या एखाद्या चांगल्या रूग्णालयात हलवून त्याच्यावर उपचार केले जातील आणि त्यासाठी लागणारी आर्थिक मदत करण्यात येईल. यापलिकडे जी काही मदत लागणार आहे ती आम्ही करू.’’- पुनीत बालन,
अध्यक्ष, पुनीत बालन