October 3, 2024

पुणे: सीआयडीकडून फरार आरोपी अटकेत, ३६७ कोटी रुपयांचा अपहार

पुणे, २५/०६/२०२३: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३६७ कोटी रुपये अनुदान अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले आठ वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने संगमनेर परिसरातून अटक केली.

 

कमलाकर रामा ताकवाले (वय ४०, रा. सराफनगर, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २०१२ ते २०१५ कालावधीत लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून ४८४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मातंग समाजातील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनखाली समाजकल्याण विभागातील अधिकारी, महामंडळातील जिल्हा व्यवस्थापकांची समिती स्थापन करण्यात आली होती.

 

२०१२ ते २०१५ या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, तत्कालिन आमदार रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, महामंडळातील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करुन ३६७ कोटी रुपयांचा अपहार केला होता. शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणात रमेश कदम यांच्यासह २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून कदम कारागृहात आहेत.

 

या गुन्ह्यातील आरोपी कमलाकर ताकवाले गेले आठ वर्ष पसार होता. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. ताकवाले नाव बदलून अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानंतर ताकवालेला संगमनेर परिसरातील एका हाॅटेलमधून अटक करण्यात आली. सीआयडीचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलीस अधीक्षक डाॅ. दिनेश बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, हवालदार कृष्णकांत देसाई, राजेंद्र दोरगे, तसेच राजूर पोलीस ठाण्यातील शिपाई अशोक गाडे यांनी ही कारवाई केली.