October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: मोक्कासह तब्बल ५३ गुन्हयात पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे, दि. १५/०९/२०२३: पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण जिल्हयात घरफोडी, जबरी चोरीच्या तब्बल ५३ गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून शिरूर परिसरातील दोन गुन्हे उघडकीस आणून एक लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अरमान प्रल्हाद नानावत वय २४ , रा. वढू हवेली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सराईत नानावत याने पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण भागात घरफोडी करीत धुमाकूळ घातला होता. तो वेळोवेळी पोलीसांना गुंगारा देत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाने अरमान नानावत याचे नातेवाईक, मित्र यांची माहिती हस्तगत केली. आरोपीचे दिनक्रम माहिती करून घेतली असता तो स्पोर्ट बाईकचा वापर करतो मोटार सायकलचा वापर करून गुन्हे करतो अशी माहिती मिळाली. तो मोटार सायकलवरच गुजरात, मध्यप्रदेश असा प्रवास करत असल्याने सकाळी पुणे जिल्हयात असे तर रात्री गुजरात मध्ये तर कधी मध्यप्रदेश मध्ये मुक्काम करत होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सलग १३ दिवस पथकाने लक्ष केंद्रीत करून आरोपी अरमान नानावत याला कोरेगाव भिमा परीसरात ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये शिरुर शहरात दोन महिलांचे गळयातील दागिने जबरीने ओढून मोटार सायकल वरून पळून गेल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, हनुमंत पासलकर, शब्बीर पठाण, विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, निलेश सुपेकर, प्रमोद नवले, दगडू विरकर, यांनी केली .