October 3, 2024

पुणे: कारागृहातील महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न, वरिष्ठ कारागृह आधिकरी अटकेत

पुणे, १५/०८/२०२३: कारागृहातील शिपाई महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी कारागृह अधिकारी योगेश भास्करराव पाटील (वय ५२, रा. जेलर बंगला, कारागृह वसाहत, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.. याबाबत एका ३९ वर्षाच्या महिला शिपायाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कारागृहात शिपाई आहे.

महिला शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी योगेश पाटील याच्याविरुद्ध बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पाटील शिपाई महिलेला वारंवार दूरध्वनी करत होता. गुन्हा मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे त्याने तिला सांगितले होते. सोमवारी (१४ ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास महिला कामावरुन घरी येत होती. त्यावेळी पाटीलने तिला गाठले. मला माहिती आहे तू भाड्याने घर घेऊन राहत आहे. माझ्याबरोबर शांतपणे चल, असे त्याने तिला सांगितले.

त्यानंतर पाटील तिच्या घरी आला. तिच्या घरातील वॉशिग मशीन घेऊन तो गेला. त्यानंतर तो पुन्हा तिच्या घरी आला. त्याच्या हातातील प्लॅस्टिकच्या बाटलीत पेट्रोल होते. तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाची होऊ देणार नाही, अशी धमकी त्याने तिला दिली. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला धक्का देऊन महिला आतील खोलीत जाऊन लपली. तिने दरवाज्याला कडी लावून घेतली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पाटील याला अटक केली असून पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.