April 16, 2024

पुणे: वेश्यागमनासाठी आला अन जाळ्यात सापडला; पिस्तूल बाळगणार्‍या सराईताला अटक, युनीट एकची कामगिरी

पुणे, दि. १०/०७/२०२३: वेश्यागमनासाठी बुधवार पेठेत आलेल्या सराईताला युनीट एकने पिस्तूलासह अटक केली आहे. त्याच्याकडून ६० हजारांचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ओंकार रामप्रकाश अंभुरे ( वय २१ रा. साक्षी अपार्टमेन्ट, तिसरा मजला, लेन नं. १२, गारमाळ धायरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

ऑल आऊट ऑपरेशनच्या अनुषंगाने युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद आणि पथक फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना सिंहगड रोड परिसरातील सराईत बुधवार पेठ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ओंकारला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० हजारांचे पिस्तूल जप्त करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सैय्यद, एपीआय आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, दत्ता सोनवणे, राहुल मखरे अमोल पवार, शशीकांत दरेकर, विठ्ठल सांळुखे, महेश बामगुडे, अभिनव लडकत यांनी केली.