May 9, 2024

पुणे: मिळकतकराची सवलतीसाठी २ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पुणे, ता. ३१/०७/२०२३: मिळकतकराची सवलत घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असताना महापालिकेचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसल्याने ही सवलत २ आॅगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी ही माहिती दिली.

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना १५ मे ते ३१ जुलै या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये निवासी मिळकत करावर पाच ते दहा टक्के सूट देण्यात आलेली आहे. गेल्या अडीच महिन्यात महापालिकेला सुमारे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न यामधून मिळालेली आहे. आज या सवलतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कर भरणा करण्यासाठी नागरिकांची गडबड सुरू आहे. ऑनलाइन माध्यमातून तसेच क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुरुवातीला सुविधा केंद्र मध्ये जाऊन नागरिक कर भरत आहेत. सकाळी दहा वाजता क्षेत्रीय कार्यालय सुरू झाल्यानंतर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र एकाच वेळी अनेक नागरिक संकेतस्थळावर कर भरत असल्याने महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा कोलमडून गेली आहे. संकेतस्थळ सुरू होत नसल्याने नागरिकांना कर भरता येत नाही. त्याचप्रमाणे अनेक नागरिक नागरिक सुविधा केंद्रांमध्ये जाऊन रांगेमध्ये उभे आहेत पण येथील यंत्रणा देखील बंद पडली आहे त्याचा फटका बसला आहे.

गेल्या वर्षी देखील शेवटच्या दिवशी कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती. त्यामुळे महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा पडून गेली होती. त्यानंतर दोन दिवस मुदतवाढ देण्यात आलेली होती. यंदाच्या वर्षी देखील महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा क्रॅश होण्याची नामुष्की ओढावलेली आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ऑनलाइन यंत्रणा बंद पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने त्यांच्या मार्गाची तपासणी सुरू आहे त्यामुळे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी आहे त्याचाही फटका अनेक नागरिकांना बसला नागरिकांची झालेली अडचण लक्षात घेऊन मिळकतकराची सवलतीसाठी २ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

“महापालिका हद्दीतील मिळकतधारकांना३१ जुलै पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरल्यास करावर ५ किंवा १० टक्के सवलत देण्यात आली होती. परंतु आज अखेरच्या दिवशी काही तांत्रिक कारणास्तव मिळकतकर भरणा काही कालावधीसाठी बंद झाला होता. मिळकतधारकांची व लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करता मिळकतकर सवलतीमध्ये भरण्याची मुदत २ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच लॉटरी योजनेचा कालावधी देखील२ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे”, अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.