पुणे, 13/05/2025 ः पुणे शहर भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज घाटे यांना संधी देण्यात आली असून, आज (ता. १३) त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपतर्फे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पुण्यामधून धीरज घाटे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांनी संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. धीरज घाटे यांना शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला असल्याने त्यांनी पुन्हा एकदा संधी द्यावी अशी मागणी पक्षाच्या नेत्यांकडे केलेली होती. तसेच शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही भूमिका तशीच होती. गेल्या आठवड्यात पक्षातर्फे शहराध्यक्षपदाच्या चाचणीसाठी पर्यवेक्षक म्हणून खासदार धनंजय महाडीक, निरिक्षक म्हणून शेखर इनामदार यांनी पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेऊन त्याचा अहवाल प्रदेशाकडे पाठवला होता. त्यातील तीन नाव अंतिम करून पक्षाच्या कोअर कमिटीपुढे प्रस्ताव ठेवला होता. त्यात घाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यापूर्वी घाटे यांची जुलै २०२३ मध्ये पुणे शहराच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकालात लोकसभा व निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. संपूर्ण शहरात सदस्य नोंदणी करून घेण्यातही त्यांनी आघाडी घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया भाजपने सुरु केली होती. त्यात पुन्हा एकदा घाटेंना संधी दिली. धीरज घाटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून, त्यांनी प्रचारक म्हणून काम केले आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी सभागृहनेते म्हणूनही कामकाज पाहिले होते.
‘‘गेल्या दोन वर्षात शहराध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने काम केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश मिळाले, त्यात संघटनेची महत्त्वाची भूमिका आहे. मला शहराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा महापौर करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू.’’
– धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप
आता कार्यकारिणीकडे लक्ष
भाजपने शहराध्यक्ष न बदलता धीरज घाटे यांना पुन्हा एकदा संधी दिली. घाटे यांच्या नव्या कार्यकालात सरचिटणीस, विविध मोर्चाचे शहराध्यक्ष यासह अन्य सुमारे ५० पदांची कार्यकारिणी पुढील काळात जाहीर करावी लागणार आहे. घाटे नवीन कार्यकर्त्यांनाच संधी देणार की जुन्याच कार्यकारिणीला पुन्हा मुदतवाढ देणार याकडे लक्ष लागले आहे. महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा यासह अन्य मोर्चाचे अध्यक्षपद मिळावे यासाठी कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली आहे.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार