July 27, 2024

पुणे: प्रसिद्ध सराफी पेढीची एक कोटी रुपयांची फसवणूक, दोन लेखापालांच्या विरुद्ध गुन्हा

पुणे, १९/०३/२०२३:  प्रसिद्ध सराफी पेढीतील लेखापालांकडून एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले. लेखापालांनी बनावट सह्या करुन अनोळखी व्यक्तीच्या नावावर धनादेश काढून एक कोटी सहा लाख ३५ हजार ७२५ रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी लेखापाल अमन ओझा, देव नारायण दुबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रांका ज्वेलर्स सराफी पेढीच्या रविवार पेठ शाखेतील व्यवस्थापक राजू दिगंबर देशपांडे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत दहा सप्टेंबर २०२० ते सात फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज देशपांडे रांका ज्वेलर्समध्ये व्यवस्थापक आहेत. अमन ओझा आणि देव नारायण दुबे सराफी पेढीत लेखापाल आहेत. दोघांनी सराफी पेढीचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशावर देशपांडे यांच्या बनावट सह्या केल्या. अनोळखी व्यक्तींच्या नावावर त्यांनी बिल तयार केले. त्यानंतर धनादेश अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करुन ओझा आणि दुबे यांनी पैसे काढून घेतले.

दोघांनी वेळोवेळी एक कोटी सहा लाख ३५ हजार ७२५ रुपये काढले. दरम्यान, ओझा आणि दुबे यांनी महिनाभराच्या अंतराने नोकरी सोडून दिली. देशपांडे यांना शंका आली. त्यांनी धनादेशाची पाहणी केली. तेव्हा धनादेशावर देशपांडे यांची बनावट सही असल्याचे आढळून आले. त्यानंतर देशपांडे यांनी गेल्या दोन वर्षातील हिशोब तपासला. त्या वेळी दोघांनी देशपांडे यांची बनावट सही करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर देशपांडे यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.