July 24, 2024

पुणे: कात्रज भागात चोरट्यांना विरोध करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार

पुणे, ०४/०६/२०२३: कात्रज भागात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयत्याने वार करुन चोरट्यांनी साडेचार हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली.

सचिन वसंत तळवार (वय ३१, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, कोल्हापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळवार पुण्यात कामानिमित्त आले होते. ते कात्रज भागातून निघाले होते. त्या वेळी तीन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा केला.

चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्यांच्याकडील साडेचार हजार रुपयांची रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. सचिन यांनी चोरट्यांना विरोध केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यांच्याकडील साडेचार हजार रुपयांची रोकड हिसकावून चोरटे पसार झाले. जखमी झालेले सचिन यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. कोल्हापूरमधील शाहुपुरी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. शाहुपुरी पोलिसांनी गुन्हा तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडे सोपविला असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ तपास करत आहेत.