December 14, 2024

पुणे: लोहगावमध्ये कोयताधारी टोळक्याचा राडा, तिघांना केली बेदम मारहाण

पुणे, दि. ६/०७/२०२३: शहरातील विविध भागात कोयताधारी टोळक्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून टोळक्याविरुद्ध ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे. किरकोळ कारणातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करीत हवेत कोयते फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. ही घटना ४ जुलैला रात्री साडे अकराच्या सुमारास लोहगावमध्ये घडली आहे.

जाहिद शेख (वय १९, रा. इंदिरानगर, येरवडा), पज्या (पूर्ण नाव नाही), उस्मान शेख (वय १८, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश चंदू राठोड (वय २१ रा. लोहगाव ) याने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गणेश हा जेवणाचे पार्सल घेउन येत असताना मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी परिसरात आलेल्या जाहिदने माझ्या मित्राला काय बोलला अशी विचारणा करीत त्याला बेदम मारहाण केली. हातगाडीवरील कोयता हवेत फिरवून मी आज तुला सोडणार नाही,कोणामध्ये हिम्मत असेल तर समोर या, अशी धमकी दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घाबरून दरवाजे बंद केले. त्यानंतर आरोपींनी सुमीत लंगडे, अभी तांबे यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक करपे तपास करीत आहेत.