September 17, 2024

पुणे: मंदीरात चोर्‍या करणार्‍या आंतरजिल्हा म्होरक्यासह तिघांना अटक, ३२ गुन्हे दाखल टोळी अटकेत

पुणे, दि. १६/०८/२०२३: जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या मंदीरातून देव-देवतांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या आंतरजिल्हा म्होरक्यासह टोळीला अटक करण्यात आले आहे. दागदागिने खरेदी करणार्‍यालाही पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ४ लाख ६७ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

भास्कर खेमा पथवे (वय ४६ रा. नांदुर दुमाला ता संगमनेर जि नगर), सोमनाथ शिवाजी भुतांबरे (वय २४ रा. समशेरपुर ता अकोले जि नगर) यांच्यासह दागिने खरेदी करणारा राजेंद्र रघुनाथ कपिले (वय ६२ रा संगमनेर ता संगमनेर) यालाही अटक केले.

जुन्नर-खेड विभागातील मंदिरातून देवदेवतांचे दागिने चोरीच्या घटना घडल्या होत्या. संबंधित चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत होते. मंदीर परिसरातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पथकाने आरोपींची ओळख पटविण्यात आली. गुन्हयातील चोरटे हे सराईत असून वेगवेगळया जिल्हयातील रेकॉर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने घोडेगाव परिसरातून भास्कर पथवे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जुन्नर, मंचर, कान्हूर मेसाई, लेण्याद्रीतील मंदिरात साथीदार सोमनाथ भुतांबरे याच्या मदतीने चोर्‍या केल्याची कबुली दिली. दोघांविरुद्ध मिळून तब्बल ३२ गुन्हे दाखल आहेत.

चोरलेले दागिने आरोपींनी संगमनेरमधील राजेंद्र कपिले याला विकले होते. त्यानुसार पथकाने त्याला अटक करुन चांदीचा गणपतासह ६ किलो ७०० ग्रॅम वजनाचे ४ लाख ६७ हजारांचे दागिने जप्त केले. दुसरा आरोपी सोमनाथ भुतांबरे याला पथकाने लेण्याद्री फाटा जुन्नर येथून अटक करण्यात आले. त्यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांनी नगर व नाशिक जिल्हयातील मंदिर घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्रकुमार चौधर, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, एपीआय दिलीप पवार, एपीआय अभिजीत सावंत, दिपक साबळे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विक्रम तापकीर, राजु मोमीण, अतुल डेरे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, सुनील शिंदे, विलास लेंभे यांनी केले