September 10, 2024

पुणे: ऑनलाईन फूड डिलीव्हरी अँपद्वारे एलएसडी विक्रीचा डाव उधळला, पाच उच्चशिक्षित तस्करांना अटक

पुणे, दि. २५/०५/२०२३: ऑनलाईन फूड डिलीव्हरी अपव्दारे ” तस्करांकडून एलएसडी अंमली पदार्थाच्या खरेदी विक्रीचा डाव पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने उध्वस्त केला आहे. याप्रकरणी उच्चशिक्षित पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ५१ लाख ६० हजारांचे एलएसडी जप्त करण्यात आले आहे.

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता कोंम्बींग ऑपरेशन, अंमली पदार्थ तस्करी करणारे गुन्हेगार यांची माहिती काढुन कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शैलजा जानकर हद्दीत पेट्रोलिंग करीत होत्या. त्यावेळी कोथरूडमध्ये अमली पदार्थ विक्रेत्याची माहिती पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना मिळाली. त्यानुसार रोहन दिपक गवई, वय २४ रा डिपी रोड कर्वे पुतळा याला ताब्यात घेत ३० ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला. चौकशीत इतर साथीदारांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले. “डनजो डिलीव्हरी अपव्दारे अंमली पदार्थाची खरेदी विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीनी संगनमत व साखळी पध्दतीने अमली पदार्थ विक्री सुरू केली होती. सुशांत काशिनाथ गायकवाड वय २६ रा. बाणेर, धिरज दिपक लालवाणी २४ रा, पिंपळे सौदागर, दिपक लक्ष्मण गेहलोत वय २५ रा आनंदनगर, ओंकार रमेश पाटील वय २५ रा. वाकड, यांना अटक करण्यात आली. तस्कराकडून ५३ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला असून त्यामध्ये ५१ लाख ६० हजारांचे एलएसडी जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय शैलजा जानकर, विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, निवेश जाधव, रेहाना शेख योगेश मोहिते यांनी केली.