October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: लोहगावात ५८ लाखांचे मॅफेड्रॉन, हेरॉईन पकडले

पुणे, दि. २४/०८/२०२३: लोहगाव भागात मॅफेड्रॉन, हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. आरोपीकडून तब्बल ५८ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपीचंद रामलाल बिश्नोई (वय २८, रा. चर्‍होली, मूळ, रा. जालोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी पथकासह शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान लोहगावमधील काळेनगर भागात एक व्यक्ती मॅफेड्रोन (एम.डी.) व हेरॉईन हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून बिश्नोईला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० लाख ७७ हजार २०० रुपये किंमतीचा ५३ ग्रॅम एम.डी तसेच ४६ लाख ८९ हजार रुपये किमतीचा ३१२ ग्रॅम हेरॉईन आढळून आले.

त्याच्याकडून अंमली पदार्थासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेक्र, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, अंमलदार योगेश मांढरे, महेश साळुंखे, शिवाजी घुले, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.