July 8, 2025

पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत

पुणे, २० जून २०२५ : पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक शनिवार, २१ जून २०२५ रोजी प्रवासी सेवेत दाखल होत आहे. हे स्थानक पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्त्वपूर्ण मार्गिकेवर स्थित असून, खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे प्रवाशांना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाणे सहज शक्य होणार आहे. या ठिकाणी मेट्रो व रेल्वे सेवांचे एकत्रीकरण होणार असल्याने या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे मेट्रोचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल.

या स्थानकाच्या सुरुवातीमुळे प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक सोयीस्कर आणि अखंड अनुभव मिळणार असून खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटल आणि मुळा रस्ता या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे सोयीचे होणार आहे.

या नव्या स्थानकाच्या उद्घाटनानिमित्त महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “पुणे मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली आहे. खडकी परिसरातील आणि आजूबाजूच्या भागांमध्ये राहणाऱ्या व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या स्थानकाचा मोठा फायदा होणार आहे.”