July 21, 2026

Pune: डांबर मिळेना, खड्डे बुजेना

पुणे, १० जुलै २०२६ : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची वाट लागली आहे. खड्डे बुजविण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी डांबर मिळत नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्यामध्ये अडचण येत आहे. महापालिका सध्या कोल्डमिक्सचा वापर करून खड्डे बुजवीत आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. या पाण्याच्या प्रवाहामुळे डांबरी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. प्रमुख चौक, उड्डाणपुलांचे उतार तसेच अंतर्गत रस्त्यांवरही हीच परिस्थिती असल्याने वाहनचालक आणि दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच शहरात ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदकाम करण्यात आले होते. या रस्ते खोदकामामुळे आणि डागडुजीचे काम करण्यात आल्यामुळेही रस्ते पूर्ववत झाले नाहीत. खोदकामानंतरच्या वरवरच्या मलमपट्टीमुळे रस्ते उखडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उघडून खडी रस्त्यावर आली आहे. युद्धामुळे डांबर मिळत नाही. त्यामुळे खड्डे अत्यंत संथगतीने बुजविले जात आहेत. पुणे महापालिका कोल्डमिक्सचा वापर करून खड्डे बुजवीत आहे.

शहरात डांबर टंचाई असल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. ही कामे करण्यासाठी आम्ही कोचीवरून डांबर आणणार आहोत. लवकरच सर्व कामे सुरळीत होतील.
– ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका