May 15, 2024

पुणे: पालखी सोहळ्यापूर्वी अतिक्रमणे काढा, बेवारस गाड्या उचला, स्वच्छता करा; महापालिका आयुक्त यांचे अधिकाऱ्यांना आदेश

पुणे, २३ मे २०२३: श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात सोमवारी (१२ जून) रोजी आगमन होत असल्याने या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालखी मार्गांची पाहणी केली. रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याबाबत तसेच पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे, मा.उपायुक्त महेश पाटील, आशा राऊत, किशोरी शिंदे, संतोष वारुळे पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरुध्द पावसकर, मुख्य उदयान अधिक्षक अशोक घोरपडे,सहाय्यक आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत, सहाय्यक आयुक्त (येरवडा कळस – धानोरी क्षेत्रिय – कार्यालय) चंद्रसेन नागटिळक,
सहाय्यक आयुक्त ( औंध – बाणेर क्षेत्रिय कार्यालय)
संदिप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त (शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालय) रवि खंदारे आदी उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांच्या पाहणीमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन संबंधितांना पालखीचे आगमनप्रसंगी करावयाच्या नियोजनाबाबत आदेश देण्यात आले.

येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध – बाणेर क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रस्ते दुरूस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणेबाबत रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याबाबत तसेच पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेवून आपतकालीन कक्षांची संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/आराम कक्षदेखील उभारण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेशित केलेले आहे. सदर कक्षांमध्ये वारकऱ्यांसाठी ओ. आर. एसची पाकिटे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होणेकामी फिरते दवाखान्यांची आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सुचना केलेली आहे.

वाहतूक पोलीसांमार्फत वाहतूक सुरळीत रहावी तसेच पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. सुरक्षेच्या कारणास्तव भवानी पेठेतील मंडपांमध्ये विसाव्याच्या ठिकाणीं सी. सी. टि. व्ही. लावण्याबाबत आयुक्तांनी सुचित केलेले आहे.

पथ विभागाच्या माध्यमातून पदपथ व रस्ते यांची डागडुजी करून घेणेस सांगितले आहे. त्याच बरोबर रस्त्यालगतच्या सिमाभिंती रंगविण्यात येणार आहे.पालखी मार्गात अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे.

विसाव्याचा ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि गेरसोय होऊ नये याकरिता पालखी दर्शन व्यवस्था व बॅरिकेडस बाबत संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर विसाव्याच्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करताना आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये याकरिता अग्निशमनविषयक सुविधा देण्यास सांगितले आहे.

पालखी मार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढणेचे आदेश अतिक्रमण विभागास दिले आहेत.

पालखी सोहळ्यानिमित्त पाणीपुरवठा विभागाकडून पालखी मार्ग व पालखी तसेच दिंड्यांच्या मुक्कामांची ठिकाणे विचारात घेऊन पालखी मार्गावर व सर्व पेठांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात येणार असून, देखभाल दुरुस्तीकामी २४ तास दुरूस्ती यंत्रणा ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी मंडळामार्फत वारकऱ्यांना जेवण / नाश्ता देण्यात येतो त्या ठिकाणीही स्वच्छता राहावी यासाठी पुरेसे कचरा वेचक सेवक उपस्थित ठेवण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

पालखी मुक्कामाच्या परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करण्यात येत असून विविध ठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ज्या दिंड्या मनपाच्या शाळांमध्ये दिंड्या मुक्कामी असतात त्या ठिकाणी पाणीपुरवठा तसेच पुरेशी शौचालये उपलब्ध करुन देण्या बाबत आदेशित केलेले आहे. आरोग्य विभागाकडून पालखी मार्गावर तसेच सर्व शाळांमध्ये औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येत आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता करण्यात येणार असून फिरती शौचालये ठेवणेत येणार आहेत. तसेच सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छ व दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी या परिसराची २४ तास स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. घनकचरा विभागास स्वच्छतेसंबंधी सर्व सुविधा पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

पालखी पुणे मुक्कामी असताना विद्युत व्यवस्था खंडीत होणार नाही याबाबत संबंधितांना सुचना करण्यात आलेल्या आहेत.