पुणे, १६ एप्रिल २०२६ : केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या इमारतींमध्ये कार्यरत असलेल्या टपाल विभागाच्या कार्यालयांना भाडे आकारणीमध्ये सवलत देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित जागांचे भाडे केवळ ०.५ टक्के दराने आकारण्यात येणार असून, विद्यमान करारांचे नूतनीकरणही त्याच दराने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
नगरसचिव कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या ठरावानुसार, टपाल विभागामार्फत पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती योजना, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस बचत बँक, आधार सेवा तसेच ‘लाडकी बहीण’ आणि ‘शेतकरी सन्मान’ यांसारख्या विविध योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविले जातात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक हित लक्षात घेऊन भाडे दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये कार्यरत असलेल्या टपाल कार्यालयांच्या सर्व जागांसाठी ही सवलत लागू राहणार आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेले भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर त्यांचे नूतनीकरणही सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे टपाल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ होईल, असा दावा केला जात आहे.

More Stories
मुळशी पॅटर्न-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; युवा उद्योजक पुनीत बालन आणि अभिजीत भोसले यांची घोषणा
सारसबाग बंद ठेवण्यावरून पुन्हा वाद; गेल्या वर्षी धार्मिक कारण, यंदा सुरक्षेचा मुद्दा
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा