July 24, 2024

पुणे: टँकरची दुचाकीस्वार माय-लेकींना धडक – महिलेचा मृत्यू; शाळकरी मुलगी गंभीर जखमी

पुणे, 28/06/2023 : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव इंधनवाहू टँकरने दुचाकीस्वार मायलेकींना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला असून सहप्रवासी शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही विस्कळीत झाली.

योगिता राजकुमार गव्हाणे (वय ३५, रा. होले काॅम्प्लेक्स, ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. अपघातात सुरेखा राजकुमार गव्हाणे (वय १६) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

योगिता गव्हाणे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कामाला निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडीजवळ भरधाव इंधनवाहू टँकरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार योगिता आणि त्यांची मुलगी सुरेखा गंभीर जखमी झाल्या. दोघींनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारांपूर्वीच योगिता यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.