July 24, 2024

पुणे: कोथरुड भागातून दोन दहशतवादी अटकेत, ‘एनआयए’च्या गुन्ह्यात फरार ; दोघांवर पाच लाखांचे बक्षीस

पुणे, १९/०७/२०२३: कोथरुड भागातून पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली. याप्रकरणात अटक केलेले दहशतवादी मूळचे मध्यप्रदेशातील रतलामचे आहेत. स्फोटके बाळगल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फरार झालेले दहशतवादी पुण्यातील कोंढवा भागात गेल्या दीड वर्षांपासून वास्तव्य करत होते. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली. संशयित दहशतवादी ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’ या उपसंघटनेशी संबंधित असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नाझण गस्त घालत होते. त्या वेळी तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. पोलिसांना संशय आल्याने आरोपी इम्रान खान, युनूस साकी यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला. त्यानंतर खान आणि साकी राहत असलेल्या घराची झडती घेण्यात आली. घरातून एक काडतूस, चार मोबाइल संच, लॅपटाॅप जप्त करण्यात आला. चौकशीत खान, साकी आणि साथीदाराविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने राजस्थानात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. एनआयएने त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. ते पुण्यात गेल्या दीड वर्षांपासून वास्तव्यास होते. पुण्यात ते कोणाच्या संपर्कात होते, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नमूद केले.

दरम्यान, एनआयएने गुन्हा दाखल केलेले आरोपी रतलाममधील सुफा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते. देशविघातक कारवाई करण्याच्या तयारीत होते. त्यांच्याविरुद्ध एनआयने स्फोटके बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
चौकट

जयपूरमध्ये बाँबस्फोटाचा कट
राजस्थानातील जयपूरमध्ये बाँबस्फोट घडविण्याच्या कट इम्रान खान, युनूस साकी आणि त्यांचा साथीदार फिरोझ पठाण यांनी रचला होता. एनआयएने याप्रकरणात चौकशी सुरु केल्यानंतर तिघेजण पसार झाले होते. त्यांची माहिती देणाऱ्यांना एनआयएने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले हाेते. ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा ‘ या उपसंघटनेशी खान, साकी संबधीत असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.

जिगरबाज पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
कोथरुड परिसरात संशयित दहशतवाद्यांना पकडणारे पाोलीस शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नाझण यांच्या जिगरबाज कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. पोलीस शिपाई चव्हाण, नाझण यांनी संशयित दहशतवादी खान आणि साकी यांना पकडले. तेव्हा त्यांनी खोटी नावे सांगितली होती. चव्हाण, नाझण यांनी दोघांचे मोबाइल क्रमांक विचारले. मोबाइल क्रमांकाची ॲपद्वारे पडताळणी करण्यात आली. तेव्हा आरोपींनी सांगितलेली नावे खोटी असल्याचे उघडकीस आले. चव्हाण आणि नाझण यांचा संशय बळावला. त्यांनी खान आणि साकी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चव्हाण आणि नाझण यांनी त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली. संशयित दहशतवाद्यांना पकडणारे चव्हाण आणि नाझण यांच्या कामगिरीचे कौतुक पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.