December 14, 2024

पुणे: दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांचा हैदोस, सकाळी फिरण्यासाठी जाणार्‍या महिलांना केले लक्ष्य

पुणे, दि. २७/०३/२०२३: शहरातील विविध भागात दुचाकीस्वार  चोरट्यांनी हैदोस घातला असून सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडणार्‍या महिलांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे पादचारी महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २७ मार्चला सकाळी पावणेसातच्या सुमारास पर्वती गाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी मनीषा शेलार (वय ३३ रा. पर्वती ) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार चोरट्यांनी कोंढवा परिसरातील गोळुकनगरमध्ये व्यायामासाठी प्रभातफेरी घालत असलेल्या महिलेला लक्ष्य केले. त्यांच्या गळ्यातील १ लाख ३५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना २७ मार्चला आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुलोचना हळंदे (वय ५० रा. कोंढवा)  यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. दोन्ही मंगळसूत्र हिसकाविण्याच्या घटना एक तासाच्या अंतराने घडल्यामुळे दुचाकीस्वार चोरटे एकच असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.