पुणे, दि. ३१ ऑगस्ट २०२४: सुरळीत वीजपुरवठा ही महावितरणची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ज्या भागात वारंवार वीजप्रश्न निर्माण होत असेल तर त्या ठिकाणच्या वीज यंत्रणेतील तांत्रिक उपायांचे किंवा फेरबदलाचे तसेच पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था आणखी सक्षम करण्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये गुरुवारी (दि. २९) आयोजित बैठकीत पुणे परिमंडलातील वीजपुरवठा, वीजयंत्रणा व वीजबिल वसूलीचा उपविभागनिहाय आढावा घेताना खंदारे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) माधुरी राऊत, अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रादेशिक संचालक खंदारे म्हणाले की, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेत तांत्रिक फेरबदल करण्याचे नियोजन आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नव्या वीजवाहिनीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन वीजयंत्रणेसाठी जागेची उपलब्धता कमी होत आहे. शहरांच्या आसपास नागरीकरण वाढले आहे. या ठिकाणी वाढलेल्या विजेच्या मागणीचा भार शहरात अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेवर देऊ नये. त्याऐवजी या शहरांजवळ नवीन उपकेंद्र किंवा वीजयंत्रणा उभारण्याचे प्रस्ताव तयार करावेत असे निर्देश त्यांनी दिले.
वीजबिलांच्या वसूलीवरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात १०० टक्के चालू वीजबिलांची वसूली अपेक्षितच आहे. यासोबतच थकित वीजबिलांच्या वसूलीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक खंदारे यांनी दिले. या बैठकीला पुणे परिमंडलातील कार्यकारी अभियंते, उपविभागप्रमुख अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान