October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

‘श्रद्धा सुमन’ कार्यक्रमाने तबलासम्राट पद्मविभूषण पं किशन महाराज यांची जन्मशताब्दी साजरी

पुणे, दि. ४ सप्टेंबर, २०२३ : तबलासम्राट पद्मविभूषण पं किशन महाराज यांचे शिष्य आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल या संस्थेच्या वतीने ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे तबलासम्राट पद्मविभूषण पं किशन महाराज यांची जन्मशताब्दी पुण्यात दिमाखात साजरी झाली. कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृह येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं अजय पोहनकर, कथक गुरु मनीषा साठे, अनुपमा आझाद आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे अरविंद कुमार आझाद हे ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करीत असतात. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून अरविंद कुमार आझाद आपल्या गुरुंना आदरांजली वाहत आहेत. या शृंखलेतील हा शेवटचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाने तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचा समारोप झाला.

तबलासम्राट पद्मविभूषण पं किशन महाराज यांचे शिष्य आणि बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं अरविंद कुमार आझाद यांच्या एकल तबलावादनाने कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली.  त्यांनी यावेळी बनारस घराण्याचे पारंपारिक उठाण, कायदे, रेला यांचे दमदार सादरीकरण केले. याबरोबरच पं अनोखेलालजी यांची गत, पंडित रामसहायजी यांची लय वैविध्य असलेली गत देखील आझाद यांनी सादर केली. बनारस घराण्याचे स्तुती परण वाजवीत त्यांनी आपल्या तबला वादनाचा समारोप केला. यानंतर बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि पं राजन साजन मिश्रा यांचे शिष्य डॉ. प्रभाकर व डॉ दिवाकर कश्यप यांचा एकत्रित शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. कश्यप बंधूंनी यावेळी राग मेघची प्रस्तुती केली. ज्यामध्ये त्यांनी विलंबित झपताल सादर केला. यानंतर त्यांनी ‘प्रबल दल साज जग…’ आणि द्रुत एकतालातील ‘कजरा कारे कारे, लागे अति प्यारे…’, ‘बरसन लागे…’ या बंदिशींचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध कथक नर्तक रुद्र शंकर मिश्रा यांच्या कथक नृत्याच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी विविध अंदाजांमध्ये तीन तालचे प्रभावी सादरीकरण केले. ‘लागे ना मोरा जिया…’ आणि ‘कारी बदरिया…’ या नृत्य रचना त्यांनी सादर केल्या. बनारस घराण्याची खासियत असलेल्या थाळी नृत्याने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. यानंतर गिरिजादेवी यांच्या शिष्या असलेल्या पद्मश्री मालिनी अवस्थी यांचे ठुमरी गायन झाले. त्यांनी राग मिश्र तिलक कामोदमध्ये ‘मोरे राजा किवडीयां ना खोल…’ या ठुमरीने कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी राग देस मल्हार मध्ये ‘आये सावन घेरी आये बदरवां…’ ही ठुमरी प्रस्तुत केली. पंडित किशन महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांनी ‘अरी कौन अलबले किनारे. झमा झम…’ हा बनारस घराण्याचा जुना दादरा सादर केला. बनारसचे ‘तुमको आने में तुमको बुलाने में कई सावन बरस गए साजना..’,  ‘कंकर मोरा लागीजे…’ ही लोकगीते त्यांनी सादर केली. ‘दिवाना किये श्याम, क्या जादू डाला… ‘ या होरीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

कार्यक्रमाचा आणि महोत्सवाचा समारोप पद्मभूषण डॉ एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाने झाला. त्यांनी राग मियां मल्हार मध्ये विलंबित, दृत आणि अतिदृत तालाचे बहारदार सादरीकरण केले. भैरवी सादर करीत त्यांनी श्रद्धा सुमन या कार्यक्रमाचा आणि पं किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचा समारोप केला. त्यांना रागिनी शंकर यांनी व्हायोलिनवर समर्थ साथ केली.

संपूर्ण महोत्सवात पं अरविंद कुमार आझाद (तबला), धर्मनाथ मिश्रा (संवादिनी), संदीप मिश्रा (सारंगी) आणि नीरज मिश्रा (सतार) यांनी साथसांगत केली. कार्यक्रमाचे निवेदन आनंद देशमुख हे करतील.