May 20, 2024

पॅरा आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुंकात कदमला ब्रांझपदक

पुणे – २५ ऑक्टोबर २०२३ – भारताच्या सुकांत कदमला चीनमध्ये हांगझू येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन ब्रॉंझपदकांवर समाधान मानावे लागले.

स्पर्धेतील एसएल ४ गटातील उपांत्य लढतीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या तिसऱ्या मानांकित सुकांतला मलेशियाच्या मोहम्मद अमीन बुऱ्हानुद्दिन कडून २१-२३, २१-११ असा पराभव पत्करावा लागला. बिगरमानांकित बुऱ्हानुद्दिनने ही लढत ३४ मिनिटांत जिंकली.

त्यापूर्वी सुकांतने दक्षिण कोरियाच्या शिन क्युंग ह्यूनचा ५७ मिनिटांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर १२-२१, २१-१७, २२-२० असा पराभव केला.

त्यानंतर एसएल ३ आणि ४ गटातील दुहेरीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित सुकांत-प्रमोद भगत या भारतीय जोडीला सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित द्वियोको द्वियोको-फ्रेडी सेटियाान जोडीने भारतीय जोडीवर २२-२०, २१-२३, १२-२१ असा विजय मिळविला. पहिला गेम संघर्षपूर्ण खेळ करून मिळविल्यावर दुसरा गेम असाच भारताने गमावला. तिसऱ्या गेमला मात्र त्यांना सातत्य राखता आले नाही.

पुणेस्थित ३० वर्षीय सुकांतने हांगझू येथे प्रथमच वैयक्तिक प्रकारात दोन कांस्यपदकांची कमाई केली. यापूर्वी सुकांत दोन पॅरा आशियाई स्पर्धेत खेळला आहे. इंडोनेशिया येथे झालेल्या जकार्ता २०१८ पॅरा आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय संघाचा सुकांत सदस्य होता.

निकाल –

दुहेरी,एमडी एसएल ३-एसएल ४

बाद फेरी

उपांत्य फेरी – पराभूत वि. द्वियोको द्वियोको/ फ्रेडी सेटियावान (इंडोनेशिया) २२-२०, २१-२३, १२-२१ – ५७ मिनिटे
उपांत्यपूर्व फेरी – वि.वि. गनिल सिंघा/ थासिरीपॉन्ग टीमारॉम (थायलंड) २१-१०, १९-२१, २१-१२ – ४१ मिनिटे

गट-अ (राऊंड रॉबिन):

दुसरी फेरी – वि.वि. हसिंग शिह हुआंग/ ये एन-चुआन (चीनी तैपेई) २१-११, २१-१५ – २९ मिनिटे

पहिली फेरी – वि.वि. उकुन रुकाएंडीय/हॅरी सुसांतो (इंडोनेशिया) २१-८ २१-१५ – ३० मिनिटे