May 20, 2024

तालदिंडी कार्यक्रमाने रंगला तालचक्र महोत्सवाचा दुसरा दिवस

पुणे, दि. २८ ऑक्टोबर, २०२३ : गायन, वादन आणि नृत्य अशा तीनही कलांच्या मिलाफाने आणि तालवाद्यांच्या दमदार सादरीकरणाने ११ व्या तालचक्र महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस संपन्न झाला. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी महोत्सव संपन्न होत असून पंडित विजय घाटे व पुनीत बालन समूह हे या वर्षी महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत.

आज पद्मश्री पंडित विजय घाटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बँक ऑफ इंडियाचे सह महाव्यवस्थापक अभिनव काळे, चंदुकाका सराफचे जाहिरात व विपणन प्रमुख अमोल पात्रे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करीत महोत्सवाला सुरुवात झाली. याबरोबरच ओर्लीकॉन बाल्झरचे प्रवीण शिरसे व सराफ अॅंड सन्सच्या विपणन प्रमुख वैष्णवी ताम्हाणे हे देखील या वेळी उपस्थित होते.

तालवाद्यांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात येणारा एक देशातील एक महत्त्वाचा संगीत महोत्सव असल्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे असे यावेळी पं विजय घाटे यांनी नमूद केले.

वारकऱ्यांच्या दिंडी सारखी ही तालवाद्य, गायन आणि नृत्याची दिंडी रसिकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचा आनंद घाटे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात राग यमन मधील तीन तालच्या सादरीकरणाने झाली. यावेळी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी… या भजन प्रस्तुतीने सुरू झालेली दिंडी पुढे तीन तालातील प्रभावी सादरीकरण, थाट, १६ चक्कर, परमेलू शृंखला यांच्या प्रस्तुतीने उत्तरोत्तर बहरत गेली. यानंतर ‘अबीर गुलाल उधळीत रंग..’ या भजनाचे सादरीकरण होऊन दिंडीचा आणि दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा समारोप झाला. .

‘यावेळी पं विजय घाटे (तबला), पं डॉ राम देशपांडे (गायन), सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर, गंधार देशपांडे (गायन), ओंकार दळवी (पखावज), अमर ओक (बासरी), सागर पटोकार (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी) यांचे एकत्रित सादरीकरण झाले.

निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन केले.

यावर्षी महोत्सवास पुनीत बालन गृप यांसोबतच चंदुकाका सराफ अँड सन्स, व्यंकटेश बिल्डकॉन, लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना मसाले, बँक ऑफ महाराष्ट्र, गिरीकंद ट्रॅव्हल्स, ओर्लीकॉन बाल्झर, विलो यांचे विशेष सहकार्य लाभले आहे,