May 16, 2024

कै विनायक निम्हण राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत राज्यभरातून ४३६ खेळाडू सहभागी

पुणे, २ ऑगस्ट २०२३: सनी स्पोर्ट्स किंग्डम  आणि सोमेश्वर फाऊंडेशन यांच्या वतीने माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ ५७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत १५ जिल्ह्यातील एकुण ४३६ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे ४ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत रंगणार आहे. 
 
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भारत देसलडा यांनी सांगितले की, ही स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेखाली व क्रीडा जागृती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत विद्यमान विश्व् विजेता संदीप दिवे, माजी विश्व् विजेते प्रशांत मोरे व योगेश परदेशी यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे.
 
क्रीडाप्रेमी मा. आमदार स्वर्गीय विनायक निम्हण यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ४ ते ७ ऑगस्ट दरम्यान ५७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा, १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान बॅडमिंटन स्पर्धा आणि १४ ते १५ ऑगस्ट दरम्यान सिक्स-अ-साईड बॉक्स क्रिकेट स्पर्धा पाषाण सुस रोड येथील सनीज वर्ल्ड या ठिकाणी होणार असल्याचे निम्हण यांनी नमूद केले. 
 
याशिवाय पुरुष गटात आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, महम्मद घुफ्रान, अभिजित त्रिपनकर, अनिल मुंढे, राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे  तर महिला गटात आंतर राष्ट्रीय कॅरमपटू काजल कुमारी, ऐशा साजिद खान, संगीता चांदोरकर आदी खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. स्पर्धेत पुरुष सांघिक गटात १५ तर महिला सांघिक गटात ६ संघ सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरीत गटात २९२, महिला एकेरी गटात ५६, पुरुष वयस्कर एकेरी गटात ७२ व महिला वयस्कर एकेरी गटात १६ महिलांचा सहभाग लाभला असल्याचे निम्हण यांनी सांगितले. 
 
दिनांक ४ ते ७ ऑगस्ट २०२३ दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेतील सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येईल. स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून विजेत्यांना रोख रुपये १ लाख पन्नास हजारांची रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल असे संयोजक सनी निम्हण यांनी सांगितले. तर ४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता सांघिक गटाने स्पर्धेला सुरुवात होईल असे कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भारत देसलडा यांनी सांगितले. 
 
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे 
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे ( मुंबई ), २) महम्मद घुफ्रान ( मुंबई ), ३) झैदी फारुकी ( ठाणे ), ४) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ), ५) पंकज पवार ( मुंबई ), ६) योगेश धोंगडे ( मुंबई ), ७) योगेश परदेशी ( पुणे ), ८) सिद्धांत वाडवलकर ( मुंबई ) 
महिला एकेरी : १) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), २) ऐशा साजिद खान ( मुंबई ), ३) काजल कुमारी ( मुंबई ), ४) अंबिका हरिथ ( मुंबई ), ५) मिताली पाठक ( मुंबई ), ६) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ), ७) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), ८) प्रीति खेडेकर ( मुंबई ) 
पुरुष वयस्कर एकेरी : १) फय्याज शेख ( पुणे ), २) शब्बीर खान ( मुंबई उपनगर ), ३) बाबुलाल श्रीमल ( मुंबई उपनगर ), ४) गिरीधर भोज ( पालघर ) 
महिला वयस्कर एकेरी : १) शोभा कमर ( कोल्हापूर ), २) रोझिना गोदाद ( मुंबई ) माधुरी तायशेटे ( मुंबई उपनगर ), मीनल लेले खरे ( ठाणे )
पुरुष सांघिक गट : १) मुंबई, २) पुणे, ३) रत्नागिरी, ४) ठाणे 
महिला सांघिक गट : १) मुंबई, २) पुणे