April 29, 2024

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या इशार्यानंतर रुबी हॉल ते रामवाडी मार्गावर अखेर मेट्रो धावणार

पुणे, ५ मार्च २०२४ : रुबी हॉल ते रामवाडी मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतलेल्या पुढाकाराला व प्रयत्नांना अखेर यश आले आहे. त्यामुळेच कोट्यवधी रुपये खर्च करून बंद ठेवलेली या मार्गावरील मेट्रो उद्यापासून (ता. ६) पुणेकरांसाठी धावणार आहे.

मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी रुबी हॉल ते रामवाडी मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबत मान्यता दिली होती. सर्व कामे पूर्ण होऊन महिने उलटले तरी या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला जात नव्हता. म्हणून अधिक दिरंगाई न करता आठवडाभरात या मार्गावरील मेट्रो सुरू करा. अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला होता. याबाबत महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रही पाठवले होते.

पुण्यात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणेकरांना दररोज तासनतास रस्त्यावर थांबावे लागत आहे. यावर उपाय म्हणून असे नवनवे प्रकल्प पुण्यात सुरू आहेत. किमान याचे भान ठेवून तातडीने हा प्रकल्प कार्यान्वित करावा. हा प्रकल्प सर्वसामान्य जनतेच्या पैशातून निर्माण झाला आहे. केवळ उद्घाटन झाले नाही म्हणून हा प्रकल्प बंद ठेवणे म्हणजे हे पुणेकरांची सत्वपरीक्षा पाहण्यासारखे आहे. आठवडाभरात प्रकल्प सुरू झाला नाही तर आम्ही आंदोलन करू, असे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी २७ फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे कळवले होते. याची दखल घेत त्वरित हा प्रकल्प अखेर सुरू होत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या त्रासाला कंटाळलेल्या अनेक पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.