April 29, 2024

पुणेः ३६ तासानंतरही बिबट्या गायब; १५० जणांची टीम शोध माहिमेत

पुणे, ०५/०३/२०२४: महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून पसार झालेल्या बिबट्याचा मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागलेला नाही. बिबट्याचा शोध घेण्यासाठी पालिका, पोलिस व वनविभागाचे कर्मचारी मिळून सुमारे १५० जणांचे पथक कार्यरत आहे. हायड्रॉलिक शिड्या, ड्रोन, थर्मल कॅमेरे आदी तंत्रज्ञानाद्वारेही बिबट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातून बाहेर पडलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

या संग्रहालयात तीन मादी व एक नर बिबट्या आहे. हंपी येथून प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमाअंतर्गत आणणेला नर बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाल्याचे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लक्षात आले. पिंजऱ्याच्या वरच्या बाजूस असलेले गज वाकवून तिथून हा बिबट्या सोमवारी पहाटेच्या सुमारास बाहेर पडल्याचे प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, जवळपास ४० तास उलटूनही बिबट्याचा शोध लागू शकलेला नाही.

बिबट्या ज्या परिसरात असण्याची शक्यता आहे, त्या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. तिथे चार पाच फुटांहून अधिक उंचीचे गवत, झुडुपे आहेत. तिथे वन विभागाचे अधिकारी, प्रशिक्षित वन्यजीव संरक्षक, प्राणी संग्रहालयातील तज्ज्ञांशिवाय कोणालाही प्रवेश दिलेला नाही. सोमवारी सकाळपासून सातत्याने बिबट्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात १५ ते २० ठिकाणी सापळे (पिंजरे) लावण्यात आले आहेत. त्यात भक्ष्यही ठेवण्यात आले आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीएचे अग्निशामक दलाचे पथक, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, वनविभागाने अधिकृत मान्यता दिलेले वन्यजीव संरक्षक, प्राणी संग्रहालयाचे अधिकारी व प्रशिक्षित गार्ड्स असे सुमारे १२० ते १५० जणांचे पथक या बिबट्याचा शोध घेत आहे. इथे असलेल्या सीसीटीव्हींबरोबरच काही सीसीटीव्ही तातडीने बसविण्यात आले असून वन्यजीव संरक्षकांकडील थर्मल सेन्सर्स व थर्मल सेन्सर्स असलेल्या ड्रोन्सच्या मदतीनेही बिबट्याचा शोध घेतला जात आहे, असे ढाकणे यांनी नमूद केले.

सचिन नावाचा हा बिबट्या साडेसात वर्षांचा प्रौढ बिबट्या असून त्याचा जन्मही प्राणी संग्रहालयातच झालेला आहे. त्यामुळे तो माणसाळलेला आहे. त्याने रविवारी रात्रीनंतर काहीही खाल्लेले नाही. त्यामुळे अन्नाचा शोधासाठी तो लपून बसलेल्या जागेतून बाहेर पडेल. तेव्हा त्याला तातडीने पकडले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

“युद्धस्तरावर बिबट्याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी पालिका, पोलिस व वनविभागासह विविध यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या आवारातच आहे. तिथून बाहेर पडण्यासाठी त्याला कोणताही मार्ग नाही. लवकरात लवकर बिबट्याचा शोध घेतला जाईल.

सध्या बिबट्याचा शोध घेण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. यानंतर या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. यात काही चुकीचे झाल्याचे आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल. तसेच प्रचलित नियमांनुसार आवश्यक त्या सुधारणाही केल्या जातील, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्पष्ट केले.