June 14, 2024

श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्जचा शेवट गोड

पुणे, २२ जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नवव्या दिवशी ट्रंकवाला(नाबाद ६७धावा) व ओम भोसले(नाबाद ३४धावा) यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्ज संघाने सोलापूर रॉयल्स संघावर ७ गडी राखून पराभव करत स्पर्धेचा शेवट विजयाने गोड केला. या स्पर्धेतील छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा हा पहिलाच विजय ठरला. 
 
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून सोलापूर रॉयल्स संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही तळातील संघांमध्ये हि लढत होत असून काल सोलापूर रॉयल्स संघाने पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली होती.   
 
पॉवरप्ले मध्ये संभाजी किंग्जच्या आनंद ठेंगे, रामेश्वर दौड, राजवर्धन हंगर्गेकर या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. पॉवर प्ले संपेपर्यंत सोलापूर संघाने आपले तीनही फलदांज अवघ्या १५ धावात गमावले. यात यश नाहर(४धावा), अवधूत दांडेकर(५धावा) आणि स्वप्निल फुलपगार(३धावा) हे पाठोपाठ झटपट बाद झाले. त्यामुळे सोलापूरची ४.१ षटकात ३बाद १५ अशी बिकट स्थिती झाली. त्यानंतर कर्णधार विशांत मोरेने १५ चेंडूत २चौकार व १ षटकारासह २१ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला ऋषभ राठोडने चौफेर व संयमी फटकेबाजी करत ४४ चेंडूत २ चौकार व २ षटकारासह ५५ धावा काढून साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी ३१ चेंडूत ४६ धावांची भागीदारी केली. विशांत मोरे २१ धावांवर खेळत असताना ऋषभ राठोड यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे चोरटी धाव घेत असताना हितेश वाळुंजने विशांतला धावबाद केले व सोलापूर संघाला चौथा झटका दिला. 
 
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस अथर्व काळेने २६ चेंडूत २चौकारासह २३ धावांची खेळी केली. अथर्व व ऋषभ या जोडीने फटकेबाजी करत ४४ चेंडूत ४४ धावा काढून संघाला ५बाद १०५ धावांपर्यंत मजल मारून दिली. अथर्व काळे २३ धावांवर असताना एक उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात शमसुजमा काझीच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. त्यानंतर मेहुल पटेलने ११ चेंडूत नाबाद २१धावा केल्या. त्यात २चौकार व १ षटकाराचा समावेश होता. सोलापूर रॉयल्स संघाने निर्धारित षटकात ६ बाद १४० धावा केल्या.
 
१४० धावांचे आव्हान छत्रपती संभाजी किंग्ज संघाने १८.५ षटकात ३ बाद १४१ धावा काढून पूर्ण केले. सलामीचा फलंदाज ओंकार खाटपे(०धाव)ला विकी ओस्तवालने त्रिफळा बाद करून संभाजी किंग्ज संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर सौरभ नवले(१६धावा) व स्वप्निल चव्हाण (१७धावा) हे बाद झाल्यानंतर छत्रपती संभाजी किंग्ज १०.३ षटकात ३बाद ६२ धावा अशा स्थितीत होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या मूर्तझा ट्रंकवालाने ५३ चेंडूत ४ चौकार व ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ६७ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मूर्तझाला ओम भोसलेने २५ चेंडूत ३चौकार व १ षटकारासह नाबाद ३४ धावा काढून साथ दिली. या जोडीने ५० चेंडूत ७९ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी मुर्तझा ट्रंकवाला ठरला.   
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
सोलापूर रॉयल्स: २० षटकात ६बाद १४०धावा (ऋषभ राठोड ५५(४४,२x४,२x६), अथर्व काळे २३(२६), विशांत मोरे २१, राजवर्धन हंगर्गेकर १-२३, रामेश्वर दौड १-२६, शमसुजमा काझी १-२३, आनंद ठेंगे १-३५)पराभूत वि.छत्रपती संभाजी किंग्ज:१८.५ षटकात ३बाद १४१धावा (मुर्तझा ट्रंकवाला नाबाद ६७(५३,४x४,३x६), ओम भोसले नाबाद ३४(२५,३x४,१x६), सौरभ नवले १६, स्वप्निल चव्हाण १७, प्रथमेश गावडे २-३४, विकी ओस्तवाल १-१७); सामनावीर-मुर्तझा ट्रंकवाला; छत्रपती संभाजी किंग्ज संघ ७ गडी राखून विजयी.