May 12, 2024

खराडीत वरिष्ठ (सिनियर) राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम सुरू

खराडी, पुणे, 29 जानेवारी 2023: कुस्ती मातीतली असो किंवा मॅटवरची महाराष्ट्राला मात्र या खेळाची अलौकिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक मल्लांनी आजवर विविध कुस्ती स्पर्धांमध्ये मैदान मारले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तर भारतीय कुस्तीपटूंनी विजयाचा डंका वाजवला आहे. मॅटवरची कुस्तीदेखील मातीप्रमाणेच आता लोकप्रिय होताना दिसत आहे. तसेच कुस्तीगीरदेखील शड्डू ठोकून मॅट कुस्तीसाठी तयार उभे आहेत, हे चित्र कालपासून (ता. २९) सुरू झालेल्या भव्य वरिष्ठ (सिनियर) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पाहायला मिळाले.

भारतीय कुस्ती महासंघ मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या सहकार्याने तसेच सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या वरिष्ठ (सिनियर) राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम येथे हा कुस्तीचा महासंग्राम ३१ जानेवारीपर्यंत रंगणार आहे. “२३ वर्षांनंतर आपल्या पुण्यात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत असून ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ या स्पर्धेचा एक महत्त्वाचा भाग आहे, या गोष्टीचा अभिमान वाटतोय. कुस्तीसारख्या पारंपरिक मर्दानी खेळाला मॅटमुळे आधुनिकता आली असली तरीही डाव मात्र पारंपरिकच आहेत आणि तेच यश मिळवून देतात. मातीची कुस्ती आणि मॅटवरची कुस्ती हा फरक बाजूला ठेवून दोन्ही प्रकारांचा मेळ घालून कुस्तीला अजून मोठे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या स्पर्धेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कुस्तीपटूंच्या कुस्तीचे सामने बघण्याची संधी पुणेकरांना व महाराष्ट्रातील नागरिकांना लाभली आहे ”, अशा शब्दांत सुरेंद्र पठारे फाऊंडेशन अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी आपले मत व्यक्त केले.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष मा. श्री संजय कुमार सिंह, उपाध्यक्ष मा. श्री. एस. फोनी, स्पर्धेचे संचालक मा. श्री. व्ही. एन. प्रसूद, हिमाचल प्रदेश सेक्रेटरी मा. श्री. जगदीश कुमार, हरियाणा कुस्ती संघाचे अध्यक्ष मा. श्री. रमेश लाहोर, तामिळनाडू सेक्रेटरी मा. श्री. एम. लोकनाथम, प्रशिक्षक मा. श्री. विनोद कुमार, मा. श्री. हरगोविंद सिंह, मा. श्री. जी. एस. सांगा यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच, वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार मा. श्री. बापूसाहेब पठारे, शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते मा. श्री. पंढरीनाथ पठारे, पुण्याचे माजी महापौर व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. श्री. मुरलीधर मोहोळ, मा. श्री. हनुमंत गावडे तसेच पै. संदीप (आप्पा) भोंडवे व हिंदकेसरी पै. योगेश दोडके हेदेखील उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान व सत्कार यावेळी करण्यात आला.

“कुस्तीपटू असतील तसेच कुस्तीप्रेमी नागरिक असतील या सर्वांसाठी ही स्पर्धा पर्वणी असणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळतेय ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. कुस्तीची ही स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या संपन्न होईल आणि यातून अनेक मल्लांना प्रेरणा व स्फूर्ती मिळेल”, असा विश्वास ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी व्यक्त केला.