April 29, 2024

श्रीराम मंदिर, अयोध्या येथील मार्गदर्शक फलकांविषयीची संकल्पना विकसित करण्याची जबाबदारी मराठमोळ्या बारीश दातेंवर

पुणे, दि. २९ फेब्रुवारी, २०२४ : उत्तरप्रदेशमधील अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या वतीने भव्य अशा श्रीराम मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सुरक्षा व भावनिकदृष्ट्याही अयोध्या हे जगातील संवेदनशील स्थळ आहे. मोठ्या संख्येने रामभक्त जगभरातून बालक रामाच्या दर्शनासाठी यायला सुरुवात झाली आहे. एका अंदाजानुसार दरवर्षी सुमारे दहा कोटी भाविक अयोध्येस दर्शनासाठी येतील. या सर्व बाबी लक्षात घेत इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक आल्यास मंदिर परिसरातील दिशादर्शक/मार्गदर्शक फलक अर्थात साईनएजेसचे किंवा वेफाईंडिंग बोर्डसचे महत्त्व अनन्यसाधारण असेल आणि ते डिझाईन करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले आहे ते बारीश दाते या  मराठमोळ्या डिझाईनरने. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बारीश दाते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऋग्वेद देशपांडे आणि निलेश सुळे आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

वास्तुविशारद असलेले बारीश दाते यांनी आयआयटी, मुंबईच्या इंडस्ट्रीअल डिझाईन सेंटर येथून मास्टर्स इन डिझाईन चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि ग्राफिक्स बियाँड या प्रामुख्याने वेफाईंडिंग व साईनएज अर्थात मोठमोठ्या प्रकल्पांसाठी दिशादर्शक / मार्गदर्शक फलकांची संकल्पना विकसित करणे व ती अंमलात आणणे अशा प्रकारची कामे करणारी ही संस्था सुरु केली. गोरेगाव मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेल्या दाते यांच्या संस्थेने पुण्यात देखील बऱ्याच प्रकल्पांवर काम केले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने मगरपट्टा, अमनोरा, लोढा बेलमॉन्डो आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर परिसरातील दिशादर्शक / मार्गदर्शक फलकांच्या संकल्पेनेविषयी माहिती देताना बारीश दाते म्हणाले, “देशाच्या कानाकोपऱ्यातून, विविध राज्यातून, विविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या संस्कृतीतून येणारे तसेच समाजाच्या विविध स्तरांमधून असणारे भाविक येथे दर्शनासाठी येतील. इतकेच नव्हे तर विविध देशांमधून देखील रामभक्त येथे दर्शनासाठी येतील. त्यामुळे मंदिर परिसरातील साईनएजेस अर्थात दिशादर्शक / मार्गदर्शक फलकांविषयीची संकल्पना विकसित करताना कोणत्या भाषा असव्यात, रंग संगती काय असावी, त्याचा आकार किती असावा तसेच खूप भाषांचा वापर टाळून योग्य अशा पिक्टोग्राम्सचा अर्थात चित्रांचा वापर करण्यावर भर दिला. त्यामुळे भाषा येत नसली तरी चित्रांच्या माध्यमातून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना अडचण येवू नये अशी काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे.”

“तब्बल २२ एकर परिसरात साकारणाऱ्या या भव्य प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थात श्रीरामाचे मंदिर हे सध्या २ एकर परिसरात विकसित करण्यात येत आहे. येथील विविध सुविधा आणि सर्व महत्वाच्या बाबांची माहिती देणारे दिशादर्शक / मार्गदर्शक फलक हे ६ फुट रुंद व १५ उंच अशा आकाराचे असतील. तसेच ते दिसण्यास कोणताही अडथला येवू नये, म्हणून ते जमिनीपासून साधारणतः ४ ते ५ फुट उंचीवर बसवण्यात येतील. यावर हिंदी व इंग्रजी भाषेत माहिती व योग्य चित्रे असतील. हे फलक भगव्या रंगाच्या दोन पाईपांवर उभे करण्यात येतील. वेदांमध्ये व श्लोकांमध्ये वापर असणाऱ्या दोन उभ्या रेघांचा असणारा वापर व त्याचे महत्व अधोरेखित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. राजस्थानातील बन्सी पहाडपुर येथील गुलाबी दगडचा वापर मंदिराच्या बांधकामामध्ये करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिशादर्शकांवरील माहिती देताना सुयोग्य अशा रंगांची निवड करण्यात आली आहे. ही निवड करताना हे फलक मंदिरच्या पार्श्वभूमीवर खूप जास्त प्रमाणात उठून दिसणार नाहीत आणि त्या वातावरणात अगदीच मिसळून जावून दिसणारच नाहीत या दोन्ही बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे,” अशी माहिती दाते यांनी दिली.

अयोध्येत मोठ्या प्रमाणात माकडं आहेत. भाविकांना ते रामाचे भक्त आणि इथले सुरक्षा रक्षक आहेत असे वाटते. तर प्राणी प्रेमींना देखील त्यांना काही इजा होऊ नये असे वाटते. त्यामुळे येथील दिशादर्शक फलकांची रचना करताना येथील माकडांना या दिशादर्शक फलकांमुळे काही इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसेच माकडांच्या वावरामुळे फलक व त्यावरील माहिती देखील खराब होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. येथील फलकांची निर्मिती त्यांच्या स्थानानुसार अॅल्युमिनियम व स्टेनलेस स्टीलच्या, काही ब्रास (पितळ) व काही कोरीयन्स या विशेष मटेरीअलचा वापरातून करण्यात येईल. यातील बऱ्याच फलकांवर सूर्यवंशाचे महत्व दर्शवणारे एक विशेष चिन्ह असेल जे रामजन्मभूमी ट्रस्टचे बोधचिन्ह देखील आहे. येत्या एक वर्षात येथील मंदिर परिसरात सुमारे २५० दिशादर्शक व माहितीपर फलक असतील. त्यातील सुमारे ७० ते ८० हे इंडोअर व इतर आउटडोअर असतील असे दाते यांनी नमूद केले.

अयोध्या हे शहर जगाच्या नकाशावर एक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. हे लक्षात घेत नजीकच्या भविष्यात अयोध्या या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊले टाकीत असताना उत्तरप्रदेश सरकारच्या अयोध्या विकास प्राधिकरण या संस्थेने २०२२ साली दिशादर्शक / मार्गदर्शक फलक डिझाईन करण्यासंदर्भात एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये जगभरातील ४०० हून अधिक डिझायनर्स सहभागी झाले होते. ज्यामधून ग्राफिक्स बियाँड या बारीश दाते यांच्या संस्थेने प्रथम क्रमांक पटकाविला आणि रुपये दीड लाखाचे रोख पारितोषिक मिळवले. ग्राफिक्स बियाँड या संस्थेने सादर केलेल्या संकल्पनेत अयोध्या येथे येणाऱ्या भक्त आणि प्रवासी नागरिकांसोबतच येथील स्थानिक रहिवासी आणि त्यांच्या गरजा देखील विचारात घेतल्या होत्या. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्यामुळे ‘ग्राफिक्स बियाँड’ या संस्थेचे नाव श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सहसचिव चंपत राय यांच्यापर्यंत पोहोचले. यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि टाटा कन्सलटिंग इंजिनिअर्स यांच्या समवेत अयोध्या येथील श्रीराम मंदिर परिसरातील दिशादर्शक / मार्गदर्शक  फलक डिझाईन करण्याची जबाबदारी बारीश दाते यांच्या ग्राफिक्स बियाँड या संस्थेला देण्यात आली.

हे फलक डिझाईन करण्याच्या सुरुवातीच्या संकल्पनेबद्दल सांगताना बारीश दाते म्हणाले, “हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर आम्ही अयोध्या नेमकी काय आहे, कशी आहे याचा शोध घेतला. अनेकदा साईट रेकी केल्या, खूप फिरलो, स्थानिक नागरिकांशी, प्रवासी, भक्तगण, प्रशासकीय अधिकारी, ट्रस्टचे सभासद यांच्याशी अनेकदा चर्चा केली आणि या शहराबद्दल जाणून घेतले. हा संपूर्ण परिसर पर्यटकांसमोर चिन्हांच्या व दिशादर्शकांच्या आधारे उलगडून दाखविणे हे आमच्यासाठी आव्हानात्मक काम होते आणि हे करीत असताना एक आपलेपणाचा, आपुलकीचा अनुभव आम्हाला या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरीकाला द्यायचा होता.”

मंदिर परिसरात येणारे नागरिक हे धार्मिक, भाषिक, सामाजिक विभिन्नता असलेले असल्याने राम मंदिर परिसरातील दिशादर्शक / मार्गदर्शक फलक हे सर्वांना समजतील अशा भाषेत आणि चिन्हांमध्ये असणे महत्त्वाचे होते. सुरुवातीला हे फलक संपूर्ण हिंदी भाषेत आणि देवनागरी लिपीत असावे असा ट्रस्टचा विचार होता. मात्र, या ठिकाणी येणारे देशविदेशातील नागरिक लक्षात घेत ते इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत असावेत हा आमचा आग्रह त्यांनी नंतर मान्य केल्याचे बारीश दाते यांनी सांगितले.