April 29, 2024

पुणे: पाषाण येथे एचईएमआरएल शेजारील दुकानावर बुलडोझर

पुणे, १ मार्च २०२४ः पाषाण मुंबई पुणे महामार्गालगत ‘हाय एनर्जी मेटेरिएल्स रिसर्च लायब्रॉटरी’ (एचईएमआरएल) या संस्थेच्या ५०० मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम केलेले शो रूम, फर्निचर मॉलसह इतर बांधकाम पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बांधकाम विकास विभागाने आज पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत ३ लाख चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले.

याच ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातही कारवाई करण्यात आली होती. पण येथील दुकानदारांनी उच्च न्यायालयात दावा दाखल करून कारवाईवर स्थगिती मिळवली होती. मात्र न्यायालयाने नुकतीच त्यांची याचिका फेटाळून लावत स्थगिती उठवून कारवाईचे आदेश दिले होते. तसेच प्रत्येक व्यावसायिकास एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान हे दुकानदार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता असल्याने महापालिकेने त्यापूर्वीच आज सकाळपासून कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम पाडून टाकले.

स्थगिती पूर्वीच कारवाई पूर्ण
कनिष्ठ अभियंता सुनील कदम म्हणाले, ‘‘न्यायालयात गेलेल्या सहा व्यावसायिकांपैकी पाच जणांच्या दुकानावर नोव्हेंबर महिन्यात कारवाई केली होती, तर एका दुकानावर आज सकाळी कारवाई केली. या व्यावसायिकाने सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती आणली पण तो पर्यंत दुकान पाडून पूर्ण झाले आहे. तसेच इतर २० दुकाने आज पाडून ३ लाख चौरस फुटाचे क्षेत्र रिकामे केले आहे.

या कारवाईमध्ये जॉ कटर मशिन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, १५ बिगारी व पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभागा होता. अधीक्षक राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कदम, राहुल रसाळे, समीर गडइ ही कारवाई पूर्ण केली.