पुणे, २३/०७/२०२३: स्वारगेट भागात तंबाखू व्यापाऱ्यावर गोळीबार करुन चार लाखांची रोकड हिसकावणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांना अटक केली. वाहन क्रमांकाच्या पाटीवर लिहिलेल्या नावावरुन पोलिसांनी तपास करुन गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडले.
सूरज वाघमोडे (वय २१ रा. भुंडे वस्ती, बावधन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघमोडे मार्केट यार्डात मजूरी करतो. चार दिवसांपूर्वी मंडई भागातील तंबाखू व्यापारी घरी निघाला होता. श्री गणेश कला क्रीडा मंच परिसरात आरोपी वाघमोडे आणि साथीदारांनी तंबाखू व्यापाऱ्यावर पिस्तूलातून गोळीबार केला होता. व्यापाऱ्याकडील चार लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून वाघमोडे आणि साथीदार पसार झाले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात पसार झालेल्या वाघमोडे याच्या वाहन क्रमांकाच्या पाटीवर आई असे लिहिले होते. पोलिसांच्या पथकाने वाघमोडेला मार्केट यार्ड भागात पकडले.
तंबाखू व्यापाऱ्याचे मंडई परिसरात दुकान आहे. दिवसभर जमा झालेली रोकड घेऊन व्यापारी दुचाकीवरुन घरी जायचा. व्यापारी सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. वाघमोडेने गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली होती, असे तपासात निष्पन्न झाले. पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील जगदाळे, हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, किशोर वळे, अनिस तांबोळी आदींनी ही कारवाई केली.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी