April 29, 2024

पुणे: महापारेषणच्या उपकेंद्रातील दुरूस्तीच्या कामासाठी मुळशीमधील काही भागात ६ तास वीज बंद

पुणे, दि. २ मार्च २०२४: महापारेषण कंपनीच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (दि. ३) सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुळशी तालुक्यातील काही गावातील सुमारे ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आढळून आला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवारी सकाळी सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या पाच वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. यामध्ये ४ वीजवाहिन्या उच्चदाब वीजग्राहकांसाठी आहेत तर एका वीजवाहिनीवरून घोटावडे, भरे, रिहे, कातरखडक, पिंपोली, मुलखेड, खानेकर वस्ती, भेगडेवाडी, ओझरकरवाडी, आंधेले गाव, बोरकरवाडी, आमलेवाडी, मातरवाडी, पडळकरवाडी, लांडगेवाडी, केमसेवाडी, खांबोली, गोडंबीवाडी एक व दोन, शेळकेवाडी, देवकरवाडी आदी गावे व वाड्यावस्त्यांना वीजपुरवठा केला जातो.

त्यामुळे सुमारे ६ हजार लघुदाब व चार उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.