December 13, 2024

‘सुभद्रा’ आंतरशालेय स्पर्धेसाठी वीस शाळा

पुणे १९ जून २०२३ – एसएनबीपी संस्थेच्या वतीने ‘सुभद्रा’ आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्याच चिखली येथील डॉ. दशरथ भोसले हॉकी मैदानावर उद्या मंगळवारपासून होणाऱ्या या स्पर्धेत वीसहून अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे.
सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्पर्धा प्रकारात ही स्पर्धा मुले आणि मुलींच्या गटातून एकूण नऊ खेळांमध्ये होणार आहे.
यामध्ये हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, थ्रो-बॉल, क्रिकेट अशा पाच सांघिक प्रकारांच्या स्पर्धा मुलामुलींच्या १२, १४ आणि १७ वर्षांखालील गटात पार पडतील. त्याचवेळी ८, १० आणि १२ वर्षांखालील गटात कराटे, योगा, किकबॉक्सिंग, स्केटिंग अशा चार वैयक्तिक प्रकारात स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धा एसएनबीपीच्या रहाटणी आणि चिखली येथील शाळांमध्ये पार पडणार आहेत. तीन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप १० जुलै रोजी होईल.
उदघाटनाच्या दिवशी मुलांकडून मुलांसाठी (किडस फॉर दि किडस) अशा वेगळ्या उदघाटन सोहल्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले म्हणाल्या, मुलांनी खेळण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच्या खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मुलांना आपले क्रीडा नैपुण्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
एसएनबीपी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. दशरथ भोसले यांच्या आईच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी संचालक अॅडव्होकेट ऋतुजा भोसले, संचालिका देवयानी भोसले, मुख्याध्यापिका श्वेता पैठणकर, नीना भल्ला आणि जयश्री वेंकटरण, शारीरिक शिक्षण संचालक फिरोज शेख उपस्थित राहणार आहेत.