पुणे, २६ जून २०२६ : शहरातील पाणीटंचाईचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने टँकरद्वारे पाणीविक्री करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी महापालिका आता कठोर पावले उचलणार आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पारदर्शक, सुरक्षित आणि नियमनबद्ध करण्यासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पाणी टंचाई व टॅंकर माफियांकडूम होणारी लूट यावर स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. महापालिकेच्या भरणा केंद्रावर ७३५ ते ११५६ रुपयांत भरला जाणारा टँकर नागरिकांना अडीच ते तीन हजार रुपयांना विकला जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.
भिमाले यांनी टँकर व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत महापालिका व खासगी टँकरची संख्या, भरणा केंद्रांची क्षमता, अधिकृत दर, चालकांची पात्रता, जीपीएस यंत्रणा, ऑनलाइन बुकिंग, अपघातांची आकडेवारी आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
नव्या एसओपीमध्ये प्रत्येक टँकरवर अधिकृत दरफलक लावणे, जीपीएस बसविणे, मोबाईल ॲपद्वारे टँकर ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध करणे, ऑनलाइन आणि हेल्पलाईनद्वारे बुकिंग व्यवस्था सुरू करणे तसेच ‘पहिली मागणी–पहिला पुरवठा’ हे तत्त्व लागू करण्याचा समावेश असेल.
याशिवाय चालकांची वैद्यकीय तपासणी, मद्यपान व अमली पदार्थ चाचणी, नियमित प्रशिक्षण, तसेच वाहनांवर सुरक्षा साधने अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याची नियमित तपासणी, क्लोरीनेशन, खासगी टँकरची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि नियमभंग करणाऱ्यांची काळी यादी तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
२४ तासांत तक्रार निकाली काढा
नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करून २४ तासांत तक्रारी निकाली काढण्याची व्यवस्था उभी करा. रुग्णालये, शाळा, पोलीस ठाणी आणि अग्निशमन केंद्रांना प्राधान्याने पाणीपुरवठा करण्याचेही निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे भिमाले यांनी सांगितले.
एसओपीमध्ये काय असणार?
– सर्व टँकरसाठी अधिकृत दरपत्रक बंधनकारक
– प्रत्येक टँकरवर दरफलक आणि जीपीएस
– मोबाईल ॲपद्वारे टँकर ट्रॅकिंग सुविधा
– ऑनलाइन व हेल्पलाईनद्वारे बुकिंग
– ‘पहिली मागणी–पहिला पुरवठा’ तत्त्व
– पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी
– चालकांची वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षण
– नियमभंग करणाऱ्या टँकरची काळी यादी

More Stories
राजगड ट्रेकला निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाला अपघात; दोघांचा मृत्यू
पुण्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजन