April 10, 2026

पुण्यातील वाहतुकीसाठी ग्रोथ प्लॅनिंगचे नियोजन सुरु; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणे, दि. १० एप्रिल, २०२६ : राज्य सरकारकडून पुण्यातील वाहतुकीसाठी ग्रोथ प्लॅनिंग करण्याचे काम सुरु असून त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी ट्रान्सपोर्ट हब, ट्रक टर्मिनल, इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे चार्जिंग टर्मिनल आदींची उभारणी करण्याचे नियोजन असल्याचे राज्याच्या नगरविकास आणि परिवहन खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.पुण्यातील प्रसन्न पर्पल या बससेवा देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून पुणे ते मुंबई मार्गावर सुरु करण्यात आलेल्या पहिल्या खासगी इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मिसाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

संगमवाडी येथील प्रसन्न पर्पलच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला स्वीच मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकांता साहू, रेड बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश संगम, पुणे जिल्हा लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर, अजय खेडेकर, प्रसन्न पर्पलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन, संचालक सौरभ पटवर्धन, हर्षवर्धन पटवर्धन आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमा दरम्यान १० इलेक्ट्रिक बसेस आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झाल्या आहेत. या सर्व बसेस स्वीच मोबिलिटी या कंपनीच्या असून पुणे – मुंबई – पुणे मार्गावर या इलेक्ट्रिक बसेस धावतील. या माध्यमातून खाजगी बस सेवा देणारी प्रसन्न पर्पल ही पहिली संस्था ठरली आहे.

सदर कार्यक्रमावेळी प्रासाविक करताना प्रसन्न पटवर्धन म्हणाले, “आज भारतात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही ५ लाख, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २ कोटी ४० लाख, मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १ कोटी १५ लाख आहे तर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही तब्बल ४० कोटी इतकी आहे. असे असले तरीही बस वाहतुकीला अपेक्षित असे प्राधान्य दिले जात नाही ही शोकांतिका आहे. कोणत्याही देशाची प्रगती ही तेथील वाहतूक साधनांच्या प्रगतीवर जोखली जाते. आज आपले ६० टक्के परकीय चलन हे पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम पदार्थ विकत घेण्यासाठी खर्च होत असताना इलेक्ट्रिक गतीशीलतेकडे वळणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने ही खाजगी इलेक्ट्रिक बस सुविधा हे आम्ही उचललेले पहिले सकारात्मक
पाऊल आहे.”

आज उर्जा पुरवठा बंद झाला तर शहरे, कारखाने आणि वाहतूक सुविधा देखील ठप्प होतात, यावर पर्याय शोधायचा असेल तर देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिसिटीचा वापर केला गेला पाहिजे. आज आपण केवळ ६५ टक्के इतकी वीज वापरत असून आपली ३५ टक्के वीज वाया जाते, तिचा योग्य विनियोग करीत परकीय चलन वाचवायला हवे आहे. देशात इलेक्ट्रिक मोबिलिटी आणायची असेल तर वाहनांची उपलब्धता, त्यासाठी आवश्यक आर्थिक मदत, गरजेच्या पायाभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही पटवर्धन यांनी केली. दुसरीकडे सरकारी अनुदानाचा लाभ खाजगी संस्थांनी करून घ्यावा असा सल्लाही पटवर्धन यांनी दिला.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बदलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे अनेक गोष्टींची अंमलबजावणी करीत असून यामध्ये सार्वजनिक वाहतूक गाड्यांची खरेदी व पायाभूत सोयी सुविधांच्या उभारणीसाठी सबसिडी उपलब्ध करून देणे, वाहतुकीसाठी सरकारी खर्चाने पायाभूत सोयीसुविधा उभारण्यावर भर देणे यांचा प्रामुख्याने समावेश आहेच शिवाय खाजगी संस्थांच्या मदतीने वाहतूक सुविधांचे पीपीपी तत्त्वावर एकीकरण करणे यांचाही समावेश असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने तीन हजार इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये दीड हजार बसेस या मुंबईसाठी आणि एक हजार बसेस या पुण्यासाठी खरेदी करण्यात येतील. मार्च महिन्यापर्यंत सरकारला ८०० बसेस मिळणार होत्या. मात्र, याऐकी फक्त ४५० बसेसच मिळू शकल्या असून त्याच्या निर्मिती प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे मिसाळ यावेळी म्हणाल्या. इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांनी त्या वेळेत उपलब्ध करून दिल्या तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नसल्याची खंत मिसाळ यांनी बोलून दाखवली.

इलेक्ट्रिक वाहनांना आवश्यक असणारे चार्जिंग स्टेशन पुरवण्यात अडचणी येत आहेत. या बसेसच्या देखभाल आणि दुरुस्तीमध्ये देखील अनेक अडचणी आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत महाराष्ट्र अद्याप पुढे गेलेला नाही असे सांगत मिसाळ पुढे म्हणाल्या की सध्या असणारी ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. वाहतूक व्यवस्थेचे जाळे सक्षम करण्यासाठी सरकारकडून नियोजन सुरु आहे. सरकारचा खासगी क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून पीपीपी तत्त्वावर सुरु करण्यात येत असलेल्या मेट्रो सारख्या योजना यशस्वी होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत देखील पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपसारखे मॉडेल राबवणे सरकारला शक्य होईल का याचा विचार करण्याची गरज आहे.

पुण्यामध्ये वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पाताळलोक हा १४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सरकार राबवणार आहे. नागरिकांनी मानसिकतेमध्ये बदल करून सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही मिसाळ यांनी अधोरेखित केले.

आज जगभर प्रगत राष्ट्रांकडे बघितले तर सार्वजनिक बस वाहतुकीवर जास्त खर्च केला जातो तर खाजगी वाहनांवर तेथे बंदी आहे. मात्र या उलट आपल्याकडे अजूनही उलट दिशेने प्रवास सुरु असून खाजगी वाहन कुठेही जाऊ शकते मात्र सार्वजनिक बस वाहतूक थांबविली जाते. जोवर हे चित्र बदलत नाही तोवर सार्वजनिक बसेसची संख्या वाढणार नाही, असेही पटवर्धन म्हणाले. लास्ट माईल कनेक्टीव्हिटीवर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी सेंट्रली बस टर्मिनल आणि कॉमन चार्जिंग सुविधा बनविण्याकडे सरकारने लक्ष घालावे, राज्य सरकारने बससाठी स्वतंत्र टर्मिनल देण्याची गरज असल्याचे प्रसन्न पटवर्धन म्हणाले.

देशातील वाहतूक व इतर समस्या पाहता आपण आपल्या मुलांना परदेशात पाठवणे हा त्यावरील उपाय नसून आपला देश बदलण्याच्या दृष्टीने आपण कोणती पाऊले उचलू शकू हा विचार होणे गरजेचे आहे. आपण करीत असलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण समाजासाठी काय करू शकू असाही विचार व्हायला हवा, असे मत सौरभ पटवर्धन यांनी मांडले.

भारतातील ट्रान्सपोर्ट ऑपरेटर संस्था आणि बस उत्पादक संस्था या निमित्ताने एकत्र येत असल्याचा आनंद संदीप गंभीर यांनी व्यक्त केला. तर इलेक्ट्रिक बसेसच्या वापरासाठी उचलेल्या या सकारात्मक पाऊलांमुळे आज तब्बल ५००० झाडे लावल्या गेली असल्याचे साहू यांनी सांगितले. आज सरकार आणि खाजगी संस्था दोघे मिळून इलेक्ट्रिक बसेस वाढविण्यासाठी करीत असलेले प्रयत्न महत्त्वाचे असून या बसेसमुळे प्रदूषण कमी होईल, परकीय चलनामध्ये आपल्याला तोटा होणार नाही, आणि प्रवाशांना देखील प्रदूषण विरहित व आरामदायी सेवा उपलब्ध होईल याकडे साहू यांनी लक्ष वेधले.

येत्या दोन महिन्यात प्रसन्न पर्पलच्या वतीने २५ इलेक्ट्रिक बसेसचा अंतर्भाव करण्यात येणार असून यामध्ये पुणे – बोरीवली – पुणे, पुणे – दक्षिण मुंबई – पुणे आणि पुणे – ठाणे – पुणे अशा ३ मार्गांवर या इलेक्ट्रिक बसेसची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या बसेसची आसन क्षमता ४५ इतकी आहे. या इलेक्ट्रिक बस मधून प्रवास करण्यासाठी तिकिटाची रक्कम साधारणतः रुपये ४०० ते रुपये ५०० या दरम्यान राहणार आहे. हर्षवर्धन पटवर्धन यांनी आभार मानले. रोहित परदेशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रसन्न पर्पल बद्दल – प्रसन्न पर्पल या खाजगी बस सेवा देणाऱ्या संस्थेतर्फे सुमारे तब्बल एक हजार प्रवासी बसेसचे व्यवस्थापन बघितले जाते. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या काही शिवाई बसेसचा देखील समावेश आहे. याबरोबरच प्रवाशांना खाजगी बस सेवा देणाऱ्या प्रसन्न पर्पल या संस्थेतर्फे महाराष्ट्रात बऱ्याच बस सेवा या सर्वप्रथम देण्याचा मान मिळवला आहे. ज्यामध्ये पुणे – नागपूर – पुणे सेमी स्लीपर (प्रसन्न गोल्डलाइन), पुणे – मुंबई – पुणे (मेट्रो लिंक) ही पहिली वातानुकुलीत बस सेवा आदींचा समावेश आहे. आजमितीला प्रसन्न पर्पल तर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला पुणे शहराशी जोडणारी बस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.