पुणे, 22/05/2026: महाराष्ट्र हा केवळ एक भूप्रदेश नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि स्वराज्य स्थापनेत योगदान दिलेल्या अनेक मावळ्यांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून तो भारताच्या स्वाभिमानाचा विषय आहे. मराठा साम्राज्य ही देशाच्या इतिहासातील प्रेरणादायी बाब आहे. त्यामुळे मराठा साम्राज्याचा नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये पुन्हा समाविष्ट झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी केली.
एनसीईआरटीने हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकला आहे. याबाबत राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. खुद्द राज्य सरकारने पत्र देऊन देखील एनसीईआरटीने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. या बाबीच्या निषेधार्थ छत्रपती वृषाली राजे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्र धर्म मोर्चाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
एनसीईआरटीकडून पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवून दैदीप्यमान इतिहासाला लपवण्याचा आणि खोटा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती घराण्यासह संपूर्ण महाराष्ट्राकडून आपण त्याचा निषेध करीत आहोत, असे छत्रपती वृषाली राजे यांनी यावेळी नमूद केले.
तसेच महाराष्ट्र सरकारने याबाबतीत केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन करतानाच त्यांनी मराठा साम्राज्याच्या नकाशाची पाठ्यपुस्तकात पुनर्स्थापना होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही दिला. या मोर्चात इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासह विविध संघटना, संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या
महापालिकेची मालमत्ता पुढाऱ्यांची जहागीरीसाठी २६ वर्षे जुना निर्णय रद्द
Pune: नीट प्रकरणात ‘मॉडर्न’ ने केले ‘त्या’ कर्मचाऱ्याचे निलंबन