May 24, 2026

कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या

पुणे, १९ मे २०२६ : महापालिकेचे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे सुमारे २०० ते २५० टन क्षमतेचे काही प्रकल्प मागील काही दिवसांपासून बंद असल्याने शहरातील कचरा व्यवस्थापनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी कचरा साचून राहत असल्याची कबुली प्रशासनाने सोमवारी दिली. बंद पडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी हे प्रकल्प बंद असल्याची माहिती महापालिकेने जाहीर का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की केशवनगर येथील साईराम आणि नेफ्रा कंपनीचे प्रत्येकी सुमारे १५० टन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प क्षमता वाढ आणि यांत्रिक दुरुस्तीमुळे बंद आहेत. तसेच रामटेकडी येथील ७५० टन क्षमतेचा ‘पूना बायो एनर्जी’ प्रकल्पही पूर्ण क्षमतेने कार्यरत नसून, गेल्या काही महिन्यांपासून तेथे केवळ १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. सूस येथील नोबल कंपनीचा २०० टन क्षमतेचा ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पही केवळ ४० टन क्षमतेने सुरू आहे.

या सर्व कारणांमुळे शहरात दररोज ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांवर कचरा साठून राहिला असून, रॅम्पवरही कचऱ्याचे ढिग वाढले आहेत.

सध्या शहरात दररोज सुमारे ११०० टन ओला कचरा निर्माण होतो. त्यापैकी केवळ ४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, तर उर्वरित ७०० टन कचरा शेतीसाठी दिला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ‘पूना बायो एनर्जी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याचाही परिणाम कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कामकाजावर होत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले. बंद असलेले प्रकल्प लवकर सुरू करण्याचे काम सुरू असून, तोपर्यंत कार्यरत प्रकल्पांवर अतिरिक्त कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.