पुणे, 06/07/2026 : “पुढील २० वर्षांच्या नियोजित विकासासाठी संरचनात्मक विकास आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) तयार करण्यात येत असून, लवकरच त्याचा मसुदा तयार होईल. त्याचा अंतिम आराखडा १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी नीती आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून पुण्यात १८ ‘ग्रोथ सेंटर्स’ उभारण्यात येत आहेत. मेट्रो स्थानकांच्या परिसरासह काही निवडक भागांमध्ये विशिष्ट संकल्पनावर आधारित विकसित होणारी ही केंद्रे रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला पूरक ठरतील,” असे प्रतिपादन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
दी प्रोफेशनल रियल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स-इंडिया (नार-इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ या देशातील सर्वात मोठ्या एकदिवसीय रियल इस्टेट सल्लागार परिषदेचे उद्घाटन डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाले. हॉटेल जेडब्ल्यू मॅरिएट पुणे येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया, ‘नार-इंडिया’चे चेअरमन एमिरेट्स रवी वर्मा, चेअरमन सुमंत रेड्डी, चंद्रेश विठलानी, आशिष मेहता, तरुण भाटिया, समीर अरोरा, ‘प्रॉप’चे अध्यक्ष उदयन माने, ‘प्रॉप कनेक्ट २०२६’चे संयोजक रमेश तोष्णीवाल, ‘प्रॉप’चे संस्थापक सदस्य किशन मिलानी, माजी अध्यक्ष दर्शन चावला, उपाध्यक्ष तनुज नगरानी व नीरज सिंग, सचिव मनीष दीडमिसे, खजिनदार मुरली रमनी, संचालक दिनेश राठी, सारंग मद्रेवार, महेश यादव, रवींद्र यादव, विक्रम मलिक, प्रीत कोहली, बांधकाम व्यावसायिक विनीत गोयल, आकाश अग्रवाल, डॉ. मोहित रामसिंघानी, विशाल जुमानी, सागर अग्रवाल आदी उपस्थित होते. देशातील ३८ शहरांतील दोन हजारांहून अधिक रियल्टर्स आणि ३०० हून अधिक विकसक सहभागी झाले होते.
डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, “पुढील २० वर्षांचा संरचनात्मक विकास आराखडा तयार करताना झोनिंगपेक्षा रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, टेकड्या आणि ‘नो डेव्हलपमेंट’ क्षेत्रांच्या संरक्षणावर भर दिला जाणार आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पुण्याच्या विकासाला नवी गती देणारा ठरेल. मेट्रो मार्गिका तीनवरील पहिल्या १२ स्थानकांवर या महिन्याअखेरीस सेवा सुरू होईल, तर संपूर्ण मार्ग २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रिंग रोडसह महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमुळे उद्योग, बांधकाम, शिक्षण, पर्यटन आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील.”
के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, “पुण्याच्या वाहतूक कोंडीवर आपल्याला काम करण्याची गरज आहे. मेट्रो कार्यान्वित झाल्यानंतर यातून दिलासा मिळेल. हे जाळे आणखी विस्तारण्यासह रिंगरोडचे काम गतीने मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावे लागतील. रियल्टी क्षेत्र पुण्याच्या विकासात योगदान देत आहे.”
मनीष जैन म्हणाले, “पुण्याच्या बांधकाम क्षेत्राला वेगळी ओळख देण्याचे काम ‘प्रॉप’ने केले आहे. तुम्ही आमचे ‘को-डेव्हलपर्स’ असून, ग्राहकांना विकासकांशी जोडण्याचे काम करीत आहात. या व्यवसायात प्रत्येकाला चांगली संधी आहे. मात्र, प्रॉपर्टी सल्लागार म्हणून व्यवसायातील सातत्य, प्रामाणिकपणा, सचोटी, ग्राहकांचे समाधान या गोष्टींना महत्व द्यावे.”
प्रास्ताविकात उदयन माने म्हणाले, ‘या परिषदेला रियल्टर्सचा मिळालेला प्रतिसाद पाहून भारावून गेलो आहे.रियल्टर्स समुदायाच्या कार्याचा गौरव करणारा आणि देशातील संघटित रियल इस्टेट क्षेत्राला एकत्र आणणारा हा उपक्रम आहे. पुण्याच्या भविष्यातील विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, उद्योजकता आणि व्यवसाय विस्तार याला दिशा मिळेल.”
दर्शन चावला यांनी सांगितले की, रियल्टर्स आणि विकसक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून उद्योगातील नव्या संधींबाबत मार्गदर्शन करण्याचा परिषदेचा उद्देश होता. ३०० हून अधिक विकसक आणि भागीदारांचा सहभाग संघटित रियल्टर्स चळवळीला अधिक सक्षम बनवेल.”
परिषदेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन यावर वैभव सिसिंटी, ‘२०२७ मधील रियल इस्टेट बाजारपेठ’ यावर सीए सार्थक आहुजा, रियल इस्टेट व्यवसायाच्या विस्तारावर राजीव तलरेजा यांनी मार्गदर्शन केले. विनोदी कलाकार विपुल गोयल यांच्या कार्यक्रमाने परिषदेची सांगता झाली.
रमेश तोष्णीवाल यांनी स्वागतपर भाषण केले. ‘द पंचशील स्टोरी’ संवादसत्रामधून अतुल चोरडिया यांची औद्योगिक यशोगाथा उलगडली. किशन मिलानी आणि खालिद मेमन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुखमणी लांबा यांनी सूत्रसंचालन केले. प्रीत कोहली यांनी आभार मानले.
————————-
चोरडियांनी उलगडली ‘पंचशील’ची यशोगाथा
पंचशील उद्योग समूहाचे प्रमुख अतुल चोरडिया यांनी ‘ब्रोकर’ ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील बांधकाम व्यावसायिक असा प्रवास उलगडला. २००२ मध्ये पंचशीलने ‘इवॉन’ पार्कची उभारणी केली. आज जगभरात पंचशील कार्यरत असून, पायाभूत सुविधा, निवासी प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प, हॉटेल्सची आंतरराष्ट्रीय दर्जाची, काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी डिझाइन्स देत कोट्यवधी स्क्वेअरफूट बांधकाम केले आहे. या यशात वेळेवर ‘डिलिव्हरी’ आणि ग्राहकांप्रती समर्पण भाव महत्वपूर्ण असल्याचे अतुल चोरडिया यांनी नमूद केले. पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात योगदान देता आल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन