पुणे, ७ जुलै २०२६ : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी, पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलचे उपाध्यक्ष तसेच पुणे आणि महाराष्ट्रात बुद्धिबळाचा प्रसार व विकास करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री. प्रकाश कुंटे यांचे आज वयाच्या ८०व्या वर्षी दुःखद निधन झाले.
बुद्धिबळ क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना सिंबायोसिस संस्थेच्या ‘उत्कृष्ट क्रीडा संघटक’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे पुणे तसेच महाराष्ट्राच्या बुद्धिबळ विश्वावर शोककळा पसरली असून, क्रीडा क्षेत्राने एक समर्पित, दूरदृष्टी असलेला आणि प्रेरणादायी संघटक गमावला आहे.
भारतीय ग्रँडमास्टर अभिजित कुंटे आणि वूमन इंटरनॅशनल मास्टर मृणालिनी कुंटे यांना घडविण्यात तसेच त्यांच्या बुद्धिबळ कारकिर्दीला योग्य दिशा देण्यात प्रकाश कुंटे यांचा मोलाचा वाटा होता. राज्यातील अनेक उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना त्यांनी सातत्याने प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.
आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुण्यातील क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंत खेळाडू, बुद्धिबळपटू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन