पुणे, ५ आॅगस्ट २०२६ : महापालिकेतील कनिष्ठ अभियंते आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. कार्यालयात बसून कागदोपत्री काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामांची पाहणी करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. क्षेत्रीय देखरेख कमी पडत असल्याने रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि इतर विकासकामांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पदपथ, गटारे, सार्वजनिक इमारती, आरक्षित भूखंड आणि अन्य महापालिकेच्या मालमत्तांची नियमित पाहणी करण्याची जबाबदारी आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण किंवा महापालिकेच्या मालमत्तेचा गैरवापर आढळल्यास त्याची तातडीने नोंद घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर करणे, संबंधित विभागाशी समन्वय साधून कामे करणे, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे ही त्यांची प्रमुख कर्तव्ये आहेत. याशिवाय विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, कामाच्या गुणवत्तेवर देखरेख, मोजमापाची पडताळणी, ठेकेदारांच्या कामावर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारीही कनिष्ठ अभियंत्यांवरच असते.
मात्र, अनेक कनिष्ठ अभियंते क्षेत्रीय पाहणी करण्याऐवजी कार्यालयातच बसून राहत असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, रस्त्यांवरील छोटे खड्डे, खचलेली ड्रेनेजची झाकणे, तुंबलेल्या वाहिन्या, खराब झालेले पथदिवे आणि अर्धवट कामांची वेळेत नोंद होत नाही. सुरुवातीला किरकोळ असलेल्या समस्या दुर्लक्षामुळे गंभीर बनतात; त्यामुळे अपघातांचा धोका, वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा त्रास वाढतो. वेळेवर पाहणी व दुरुस्ती न झाल्याने एकाच कामावर पुन्हा-पुन्हा खर्च करावा लागतो आणि महापालिकेचे आर्थिक नुकसानही होते.
नागरिकांच्या समस्या तातडीने सुटाव्या यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी, प्रत्येक कनिष्ठ अभियंत्याने कार्यालयात बसण्यापेक्षा आपल्या कार्यक्षेत्रात अधिक वेळ द्यावा, प्रत्यक्ष कामांची तपासणी, ठेकेदारांकडून सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता आणि नागरिकांच्या तक्रारींची जागेवर जाऊन पडताळणी करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कनिष्ठ अभयंत्यांनी एका जागेवर बसून न राहता शहरात फिरून समस्या सोडवण्यावर भर द्यावा असे आदेश आयुक्त राम यांनी दिले आहे.

More Stories
अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीवर महापौर आक्रमक; पोलिसांना १५ दिवसांचा अल्टिमेटम
Pune: चिखलामुळे अपघात झाल्याने महापालिकेची बिर्ला बिल्डरला नोटीस