पिंपरी-चिंचवड, २९ आॅक्टोबर २०२६ : नवीन क्षेत्रीय कार्यालये सुरू केली, पण त्यांना पुरेसे कर्मचारी, वाहने आणि यंत्रसामग्रीच दिली नाही. त्यामुळे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या रायगड (ज) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कचरा संकलन आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेला जवळपास तीन महिने उलटूनही परिस्थिती सुधारलेली नसल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कचरा टाकण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापनाची घडी अद्याप पूर्णपणे बसलेली नाही. कचरा खाली करण्यासाठी वाहनांना चार ते पाच तास लागतात. दुसरीकडे, वाहनांची संख्या अपुरी असल्याने कचरा संकलनाच्या फेऱ्या कमी होत आहेत. ठेकेदारांकडूनही आवश्यक वाहने वेळेत उपलब्ध होत नसल्याने सोसायट्यांमधील कचरा नियमित उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, परिसरात कचरा साचणे आणि दुर्गंधी पसरण्याचे प्रकार घडत आहेत.
विस्तार वाढला, यंत्रणा मात्र अपुरी
रायगड (ज) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक १६, २५ आणि २६ यांचा समावेश आहे. वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख, रावेत, किवळे आणि मामुर्डी या वेगाने विकसित होणाऱ्या भागांची जबाबदारी या कार्यालयावर आहे. लोकसंख्या आणि नागरीकरणाचा वेग वाढत असताना कचरा संकलनासाठी पुरेशी वाहने, स्वच्छता कर्मचारी आणि अन्य साधने उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.
नवीन कार्यालये सुरू करूनही मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर या कार्यालयांचा उपयोग काय, असा सवाल कलाटे यांनी उपस्थित केला आहे. क्षेत्रीय कार्यालये ही केवळ प्रशासकीय रचना न राहता नागरिकांना वेळेत सेवा देणारी यंत्रणा बनली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
ठेकेदारांवर कारवाईची मागणी
कचरा संकलनासाठी पुरेशा घंटागाड्या आणि अन्य वाहने उपलब्ध करून द्यावीत, वाहनांच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि ठेकेदारांच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, मेकॅनिकल स्वीपिंगद्वारे रस्ते स्वच्छ ठेवावेत, तसेच गटारांची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक जेटिंग मशीन आणि अन्य यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
चौकट : सांडपाणी थेट नाल्यांत?
वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता अपुरी असल्याचा मुद्दाही कलाटे यांनी उपस्थित केला आहे. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न झाल्यास ते नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांत मिसळण्याचा धोका आहे. त्यामुळे पर्यावरण, जलस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पुरेशा क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, सध्याच्या प्रकल्पांची क्षमता वाढवावी आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलप्रवाहांत सोडले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

More Stories
पवना धरण ९९ टक्के भरले; विसर्ग वाढणार, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – महापालिकेचे आवाहन
NEET 2026 मध्ये अखिल भारतीय स्तरावर 498 वा क्रमांक मिळवणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कन्या अतुल्या डोंगरे यांचा महापौरांकडून गौरव..
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी