October 6, 2026

तुम्ही ‘एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्या; मी दिल्लीत ज्ञानेशकुमारांचा राजीनामा घेतो: अभिजीत दिपकेचे पुण्यात वक्तव्य

पुणे, ५ आॅक्टोबर २०२६: एमपीएससीच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा रविवारी जोश आणखी वाढला. एस. एम. जोशी पुलाजवळ हजारो विद्यार्थी घोषणांनी परिसर दणाणून सोडत असतानाच विविध राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. याच वातावरणात कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी आंदोलनात सहभागी होत सरकारला थेट आव्हान दिले. “तुम्ही एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्या, मी दिल्लीत ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेतो,” असे सांगत त्यांनी आंदोलनाची धार आणखी तीव्र केली.

एमपीएससी परीक्षांतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि आयोगाच्या कारभारावरून २ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह विविध नेत्यांनी पाठिंबा दिला. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चेचा मार्ग काढण्याची भूमिका मांडली.

दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडूनही आंदोलनस्थळी भेटी देण्यात आल्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न सोडवणारा उपाय नसल्याचे सांगत आंदोलनात विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नये, अशी भूमिका मांडली. मंत्री नितेश राणे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि रोहित पवार यांनी चर्चेची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.

या पार्श्वभूमीवर दीपके यांच्या वक्तव्याने आंदोलनाला वेगळे राजकीय परिमाण मिळाले. “महाराष्ट्रातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. चुकीचे झाले असेल तर राजीनामा का द्यायचा नाही?” असा सवाल त्यांनी केला. सरकारने तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दीपके यांनी पुणे बंदची हाक देण्याची भूमिकाही मांडली. आपण पुण्यातून निघाल्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होणार असून, पुण्यातील विद्यार्थ्यांनी येथे लढा सुरू ठेवावा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची व्याप्ती आता पुण्यापुरती मर्यादित न राहता दिल्लीपर्यंत जोडली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, एमपीएससी सचिव महेंद्र हरपळकर यांची बदली करण्यात आली असली तरी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्याबाबत राज्य सरकारला थेट निर्णय घेता येत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. अध्यक्ष हे घटनात्मक पद असल्याने त्यांच्या पदाबाबत केंद्राच्या घटनात्मक प्रक्रियेनुसार निर्णय होतो, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा आणि सरकारची भूमिका यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.