April 27, 2024

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर

पुणे, दि. २७ मार्च, २०२४ : राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार २०२४ यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना जाहीर झाला असल्याची घोषणा राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ वैजयंती वंदन नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर यांनी केली.

ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून येत्या दि. ६ एप्रिल रोजी सायं ५.३० वाजता नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी हा पुरस्कार समारंभ संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होईल, अशी माहिती देखील डॉ. वैजयंती नगरकर व समीर बेलवलकर यांनी दिली.

रोख रुपये ११ हजार, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. या आधी विनोदी अभिनेते भाऊ कदम, निलेश साबळे आणि समीर चौघुले या मान्यवर कलाकारांना राम नगरकर कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यावेळी अधिक माहिती देताना डॉ वैजयंती वंदन नगरकर पुढे म्हणाल्या, “माझे पती वंदन नगरकर यांनी मागील पुरस्कार सोहळ्यात पुढील पुरस्कार विशाखा सुभेदार यांना पुरस्कार देऊ असे जाहीर केले होते. मागील वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेचा मान ठेऊन यावर्षी राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आम्ही विशाखा सुभेदार यांना राम नगरकर कलागौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करीत आहोत.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राम नगरकर यांच्या ज्येष्ठ कन्या मंदा हेगडे या राम नगरकर यांचा लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या ‘रामनगरी’  कार्यक्रमाचा काही भाग सादर करतील. याबरोबरच पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे विशाखा सुभेदार यांची प्रकट मुलाखत घेतील.